मुंबई : विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात स्क्रीम या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. ५ ते ८ जानेवारीदरम्यान भरणार्या चारदिवसीय महोत्सवात देशभरातील ८00 महाविद्यालयांतील खेळाडू १३ हून अधिक क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवतील.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वसिम जाफर, माजी ज्युडो खेळाडू आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त विजेती पूनम चोप्रा, भारतीय पॅरालिम्पिक क्रिकेट संघाचा कर्णधार आशिष श्रीवास्तव, मंदार फडके, उदय बेडेकर इ. खेळाडू उद््घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. नवनवीन क्रीडा स्पर्धा आणि मान्यवर व्यक्तिमत्त्वांचे बहुरंगी कला प्रदर्शन यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. पिकलबॉल खेळ महोत्सवात खेळवण्यात येणार आहे. व्हीलचेअर बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित सामना महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, अँथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, स्क्वॉश, रिंक फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस आणि बॉक्स क्रिकेट स्पर्धा क्रीडा महोत्सवात भरतील.