मुंबईला योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या तैलचित्रांकड़े महापालिकेचे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईला योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या तैलचित्रांकड़े महापालिकेचे दुर्लक्ष

Share This
सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज आणि प्रबोधनकारांचे पुतळे प्रतीक्षेत
मुंबई / अजेयकुमार जाधव / 1 Jan 2017 -
मुंबई भारताची आर्थिक राजधानी असलेले शहर. या शहरासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. मुंबई शहरासाठी योगदान देणाऱ्या अश्या थोर महापुरुषांची तैलचित्र पालिका सभागृहात लावण्यात आली. मात्र पालिका मुख्यालयाला 17 वर्षापूर्वी लागलेल्या आगी नंतर आजही या महापुरुषांची तैलचित्रे दुर्लक्षित आहेत.

मुंबईला योगदान देणाऱ्या युसूफ मेहरअली, खुर्शीद फ्रामजी नरिमन, स. का. पाटील, फिरोजशहा मेहता, इब्राहिम रहिमतुल्ला, विठ्ठलभाई पटेल, जे. बी. बोम्मन बेहेराम, व्ही. एन. चंदावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून पालिका सभागृहात तैलचित्रे लावण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या सभागृहाला 13 जानेवारी 2000 भीषण आग लागली होती. या आगीत सभागृहातील अत्यंत मौल्यवान 9 तैलचित्रे जळाली होती. या घटनेला आता 17 वर्षे उलटली, मात्र आजमितीस तैलचित्रे लावण्यात आलेली नाहीत.

भाजपाचे नगरसेवक व सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे हे गेल्या 15 वर्षापासून ही तैलचित्र
पुन्हा लावण्याची प्रशासनाकडे मागणी करीत आहेत. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आले आहे. नुकतेच महापालिकेने प्रबोधन ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव मंजूर केला आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधन ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे. सध्या पालिका सभागृहात नानाशंकर शेठ यांचे एकमेव तैलचित्र सभागृहात आहेत. नानाशंकर शेठ यांच्या तैलचित्राच्या बाजुलाच प्रबोधन ठाकरे यांचे तैलचित्र लावले जाणार असले तरी अद्याप इतर 8 तैलचित्र लावण्याच्या जागा मात्र रिकाम्याच असल्याने या मुंबईकरांची तैलचित्रे 17 वर्षानी लावण्याकड़े प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सावित्रीबाई फुले, कुसुमाग्रज आणि प्रबोधनकारांचे पुतळे प्रतीक्षेत
मुंबई महापालिकेच्या सभागृहात सध्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती भालचंद्र भाटवडेकर, डोसाभाई कराका यांचे पुतळे तर नाना शंकरशेठ यांचे तैलचित्र आहे. मात्र या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याआधी सावित्रीबाई फुले आणि वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे पुतळे बसवण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. मात्र हे पुतळेही अद्याप बसवण्यास पालिकेला यश आलेले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages