दि. 2 जानेवारी 2017 -
मुंबई : प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष करत आपल्या विचारांनी समाजात परिवर्तन घडविणारे प्रबोधनकार केशव ठाकरे हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण समारंभ आणि महानगरपालिकेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पर्यावरण मंत्री रामदास कदम, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राहूल शेवाळे, आमदार राज पुरोहित, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, माजी मंत्री ॲड. लीलाधर डाके, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आदि उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत समाजात सुधारणेसाठी कष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुले हे प्रबोधनकारांचे आदर्श होते. समाजातील जातीयता, हुंडा पध्दती, महिला अत्याचाराविरुध्द ते हिमतीने उभे राहिले होते. जोपर्यंत या प्रथांमध्ये बदल होत नाही तोपर्यंत मी लढत राहीन, जनतेचा ईश्वर जनतेला मिळाला पाहिजे, असे ते म्हणत.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रामाणिक व सच्चा माणूस म्हणून राजर्षी शाहू महाराजांनीही प्रबोधनकारांचे कौतूक केले होते. प्रबोधनकारांचा वसा पुढे नेण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. बाळासाहेबानंतर हे काम उध्दव ठाकरे करीत असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
प्रबोधनकारांचे विचार, त्यांनी केलेला संघर्ष व त्यांचा जीवनपट लक्षात घेता महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये त्यांचे स्थान महत्वाचे आहे. प्रबोधनकारांचे विचारांच्या प्रसारासाठी राज्य शासन निश्चितच प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. देश व राज्याच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होण्याचा संकल्प नवीन वर्षात करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रबोधनकार हे समाजातील अनिष्ट रुढी व परंपरांच्या विरुध्द, तसेच अन्यायाविरुद्ध लढणारे होते, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा जपतच आम्ही कामकाज करत आहोत. प्रबोधनकारांचे तैलचित्र महापालिकेच्या सभागृहात लावण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांचेही ठाकरे यांनी आभार मानले. महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिकेच्या विविध लोकोपयोगी कामांची माहिती दिली. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांनी स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण व दुकाने व आस्थापना ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण संगणकीय प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. प्राथमिक शाळांना ऑनलाईन पूर्वपरवानगी देण्याच्या व महापालिकेच्या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण उध्दव ठाकरे यांच्या हस्ते तर महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशीनचे लोकार्पण महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकारांचे तैलचित्र तयार करणारे संजय सुरी व रवी जसरा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला.