विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचार - अर्थसंकल्पात १८ कोटी ६६ लाखांची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचार - अर्थसंकल्पात १८ कोटी ६६ लाखांची तरतूद

मुंबई - महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. पालिकेने अर्थसंकल्पात याकरिता १८ कोटी ६६ लाख रुपयांची विशेष तरतूद केली आहे. 'शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत हे उपचार केले जाणार आहेत. मागील वर्षी साधारणपणे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची तपासणी केली असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यादृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत वैद्यकीय तपासणी विभागात 'वैद्यकीय अधिकारी (शाळा)' कार्यरत असतात. मनपा शाळातील विद्यार्थ्यांसाठी सध्या ८ ठिकाणी स्वतंत्र चिकित्सालय (क्लिनीक) आहेत. हे क्लिनीक केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. एन. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, बोरिवली येथील भगवती रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय व लायन्स जुहू दंत चिकित्सालय अशा ८ ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील १७५ दवाखान्यांमध्येही या विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केले जातात. शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत जून २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सुमारे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिक शाळांमधील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांचा तर माध्यमिक शाळातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच विशेष शाळांमधील ४६४ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. यापैकी २६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना मोफत उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. तर २८० विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तसेच तपासणीच्या नोंदी ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना 'हेल्थ कार्ड' दिले जात असून यावर त्यांची जन्म तारीख, उंची, वजन यासह वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक ती माहिती नोंदविली जाता आहे. प्राथमिक तपासणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वा दवाखान्यांमध्ये नोंदणी करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना 'वैद्यकीय अधिकारी (शाळा)' यांच्यामार्फत स्वतंत्र 'क्लिनीक कार्ड' किंवा 'डिस्पेन्सरी कार्ड' देण्यात येते आहे. या कार्डच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार केले जात असल्याची माहिती पालिकेने दिली.

मोफत हृदय शस्त्रक्रिया - शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्या दरम्यान जन्मजात हृदयरोग असणाऱ्या ५ विद्यार्थ्यांवर गेल्या वर्षी मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तसेच नेत्रदोष आढळून आलेल्या ७२४ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देखील देण्यात आले.

चिकित्सालयांसाठी 5 कोटीची तरतूद - २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये वैद्यकीय तपासणी विभागांतर्गत असणा-या 'वैद्यकीय अधिकारी (शाळा)' यांच्या संबंधीच्या कार्यवाहींसाठी सुमारे १३ कोटी ४३ लाखांची तरतूद केली आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत असणाऱ्या ८ चिकित्सालयांसाठी सुमारे ५ कोटीची तरतूद केली आहे. एकूण १८ कोटी ६६ लाखांपेक्षा अधिक रकमेची तरतूद प्रस्तावित आहे.

Post Bottom Ad