पुर्णा दगडफेक निषेधार्थ आरपीआय (अ)चा मंत्रालयासमोरील रास्तारोको रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2017

पुर्णा दगडफेक निषेधार्थ आरपीआय (अ)चा मंत्रालयासमोरील रास्तारोको रद्द

मुंबई / अजेयकुमार जाधव - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर जातीवादी लोकांकडून दगडफेकी करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईत २ ठिकाणी आंदोलने करण्यात येणार होती. मात्र आरपीआय आठवले पक्ष राज्यात आणि केंद्रात भाजपा तसेच शिवसेनेबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसला असल्याने २६ एप्रिल रोजी मंत्रालयासमोर केला जाणारा रास्ता रोको रद्द करण्यात आला आहे. आपल्या आंदोलनमुळे भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष अडचणीत येऊ नयेत अशी काळजी आरपीआय (आठवले) पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून घेतली गेल्याचे समजते.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर जातीवादी समाजकंटकांकडून दगडफेकी करण्यात आली. या घटनेतील दगडफेक करणाऱ्या राजकीय पुढारी असलेल्या आरोपींना पकडण्याचे सोडून पोलिसांकडून मिरवणुकीत सहभागी झालेल्या बौध्द तरुणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याने तसेच दंगल घडवू पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांकडून आणि सरकारकडून शिवसेनेच्या पुढाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आंबेडकरी संघटनांच्या वतीने २३ एप्रिलला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बांद्रा कला नगर येथील "मातोश्री"वर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

इतर आंबेडकरी संघटनानी मोर्चे काढण्याचे जाहीर केल्याने आठवले गटाचे कार्यकर्तेही काही कमी नाहीत म्हणून २६ एप्रिलला राज्यभर निदर्शने व मंत्रालयाला समोर रास्तारोको आंदोलन घोषित करण्यात आले. या आंदोलनावेळी पुर्णा घटनेतील दगडफेक करणाऱ्या आरोपींना त्वरित पकडण्यात यावे, त्यांच्यावर एट्रोसिटी एक्ट गुन्हा दाखल करावा. दगडफेक करणाऱ्यांना आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी बौध्द तरुणांना अटक केली आहे. पुर्णा येथील सिध्दार्थ नगर, आंबेडकर नगर, फुले नगर, भीमनगर, विजयनगर आणि रेल्वे कॉलनी येथील बौद्ध युवकांना सोडून द्यावे. ज्या पोलिसांनी या संदर्भातील कारवाईत दिरंगाई केली असेल अशा पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना तातडीने निलंबित करावे इत्यादी मागण्या केल्या जाणार होत्या.

या आंदोलना दरम्यान आरपीआय(आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेद्वारे मुंबई सरचिटणीस प्रशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले जाणार होते मात्र आंदोलन जाहीर होताच आरपीआय आठवले गटातील वरिष्ठ नेत्यांनी सूत्र हलवत आपला पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असल्याने २६ एप्रिलचे आंदोलन करू नये असा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी संघटनेने जाहीर केलेला रास्ता रोको रद्द करण्यात आलं आहे. रास्ता रोको रद्द केला असला तरी आम्ही स्थानिक ठिकाणी निषेध नोंदवू असे बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad