सेवा हक्क कायद्याचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा - स्वाधीन क्षत्रिय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

सेवा हक्क कायद्याचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा - स्वाधीन क्षत्रिय

मुंबई, दि. 5 : शासनाच्या सेवा निश्चित कालावधीत व पारदर्शकपणे मिळाल्या पाहिजेत यासाठी नागरिकांनी सेवा हक्क कायद्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे केले. नरिमन पॉईंटस्थित निर्मल इमारतीत राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन आज क्षत्रिय यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्षत्रिय म्हणाले, राज्य शासनाने सेवा हक्क कायद्यासारखा क्रांतिकारक कायदा केला आहे. यामुळे नागरिकांना सेवा ही ठराविक कालावधीत प्राप्त करुन घेण्याचा हक्क मिळाला आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. शासनाने 25 विभागाच्या 379 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. नागरिकांना जी सेवा हवी असेल ती राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात उपलब्ध आहे. या सर्व सेवा ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवरही मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत.

राज्यात सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रत्येक महसूल विभागात सेवा हक्क आयुक्त यांची लवकरच नेमणूक करण्यात येईल. सेवा हक्क कायद्याबाबत काही अडचणी आल्यास, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, 2 रा मजला, सिडको, निर्मल इमारत, नरिमन पॉईंट, मुंबई-400 021 या पत्त्यावर संपर्क करण्याचे तसेच ईमेल-ccrts@maharashtra.gov.in, 022-22846741, 022-66500918 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करण्याचेआवाहनही क्षत्रिय यांनी यावेळी केले.

Post Bottom Ad