ठाणे जलवाहतूक व्यवस्था लवकरच सुरु करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

ठाणे जलवाहतूक व्यवस्था लवकरच सुरु करणार - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : ठाणे-मीरा भाईंदर शहरावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी शहरातून ठाणे व वसई या खाडीचा वापर जलवाहतूकीसाठी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन ठाणे जलवाहतूक व्यवस्था लवकरच सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या द नॅशनल वॉटर वे ॲक्ट नुसार महाराष्ट्रात 14 मार्ग हे राष्ट्रीय (नॅशनल वॉटर वे) जलवाहतूकमार्ग घोषित केलेले असून 7 मार्ग खाड्यांच्या कक्षेत आहेत तर 7 मार्ग नदींमध्ये आहेत. ठाणे खाडीतील जलमार्ग हा नॅशनल वॉटर वे एन. डब्ल्यू.-53 असून त्याची लांबी 145 कि.मी. आहे. या संदर्भातील ठाणे महानगरपालिका डीपीआर तयार करत आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने 3 वेळा निविदा मागविण्यात आल्या. सध्या निविदा मंजुरी टप्प्यात आहे. सल्लगार नियुक्त झाल्यानंतर डीपीआर तयार करुन सागरमाला अंतर्गत मंजूरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल. या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला सक्षम अधिकारी नेमण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, कल्याण-ठाणे-कोलशेत-गायमुख-भाईंदर-वसई अशी प्रवासी जलवाहतूक करता येणार आहे. सद्य:स्थितीत कल्याण,वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे येथे जेटी बांधून प्रवासी जलवाहतूक करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गोराई, बोरीवली, वसई व भाईंदर रो-रो वाहतूक प्रस्तावित असून त्यास केंद्र शासनाची सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर या कामाला सुरुवात करण्यात येईल. गायमुख येथे खाडी किनारा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेने 13.08 कोटी रक्कम मंजूर केली आहे. यामध्ये 150 मीटर लांब सीट पिलींगच्या माध्यमातून सागर किनाऱ्याचा विकास आणि सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. टप्पा-2 मध्ये 125 मीटर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट करणे व या एकत्रित 275 मीटर लांबीवर स्वच्छतागृहे,उपहारगृहे, जेट्टी, ॲम्फी थियटर, लँडस्केपिंग इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. या कामासाठी 25 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रक व अवजड वाहनांची वाहतूक ठाणे शहराबाहेरुन वळती करण्यासाठी कशेळी ते घोडबंदर या दरम्यान ट्रकची जलमार्गाने वाहतूक (ट्रक रो-रो) प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व जलवाहतूक कामामुळे ठाणे शहरावरील वाहतूकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून मुंबई-ठाणे येथून गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी जलवाहतुक हा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून खाडीचा जलवाहतुकीसाठी वापर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य संजय केळकर, राज पुरोहित, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

Post Bottom Ad