डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समजलो तरच भारताचे चित्र बदलेल - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 April 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समजलो तरच भारताचे चित्र बदलेल - राजकुमार बडोले

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) ः हजारो वर्षे जाती-धर्माच्या नावावर माणसा-माणसात भेद निर्माण करण्यात आला. आजही आडनावावरून जातीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र बाबासाहेबांनी समाजातील वंचित, शोषित, पिडीत माणसाला जाती-धर्माच्या पलिकडचा विचार देऊन इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी संविधानात स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता या तत्वांना समाविष्ट केले. त्यामुळेच भारतातील जातीधर्मातील विभाजीत समाज एकत्र नांदू शकतो, बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने समजलो तरच भारताचे चित्र बदलेल असे ठाम मत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन सायन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षिय भाषणात ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, आजही आडनाववरून जातीचा शोध घेण्याची प्रवृ्त्ती समाजात आहे, आजही अत्यंत गरिबीत जगणारी लोकं कोणत्या जातीची, बिऱ्हाडावर असणारी, सर्वाधिक दारिद्र्य रेषेखाली असलेली माणसे, भुमीहिन असणारी लोकं कोणत्या जाती-धर्माची आहेत, काही जातीमुळे वरती राहिली तर काही खाली, ह्या हजारो वर्षांच्या विषमतेच्या परंपरेवर बुध्दांनी प्रहार केले. इतिहासात अनेक महापुरूषांनीही विषमतेवर प्रहार केले, मात्र वाळवंटात लुप्त होणाऱ्या त्यांच्या या महान वैचारिक रोपट्याला सिंचित करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज अशा अनेकांच्या विचाराच्या परंपरेला पुढे नेण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले, असेही बडोले म्हणाले.

जातीच्या नावावर माणसामाणसात भेद का केला जातो. एक दुसऱ्याला का विभागून ठेवले जाते. सर्वांच्या रक्ताचा रंग एकच आहे तर मग ही विषमता का असा रोखठोक सवाल विचारणारी डॉ. बाबासाहेबांची विचारधारा आहे. त्यांनी जात, धर्म, भाषा, स्त्री-पुरूष या पलिकडे जाऊन आखिल मानव समाजासाठी कार्य केले. मात्र अशा महान लोकांना आपापल्या जातीमध्ये बांधून ठेवण्याची प्रवृती समाजात आहे. मात्र बाबासाहेबांना एका जातीधर्मात बांधून ठेवता येणार नाही, त्यांचे विचार आजच्या पिढीने समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे दिली. मात्र आजही आपण स्वतंत्र आहोत काय, जाती-जातीत विभागल्यामुळे आमच्यात समता आहे काय आणि समताच नाही तर बंधुत्व कसे येणार असा सवाल करत बडोले म्हणाले आजच्या आधुनिक पिढीने बाबासाहेब समजून घेतले पाहिजे. देशाच्या दृष्टीने बाबासाहेबांचे विचार प्रगल्भ होते, त्यांनी सर्व जाती-धर्माच्या माणसाला सक्षम करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. देशाची प्रगती एका व्यक्तीने नव्हे तर सर्वांनी मिळून करायचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यामुळे त्यांची विचारधारा समजून घेण्याची आवश्यकता आहे, त्यांचे विचार समजून घेतले तरच देशाचे चित्र बदलेल असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकात मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी करून नवचैतन्य निर्माण करण्याचे तसेच गावागावत बाबासाहेबांचा समतेचा संदेश पोहचवण्यासाठी सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याची कल्पना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी रूजवली. सप्ताहामुळे समाजातील सर्वच वर्गाला आणि विविध शासकिय विभागांना सामावून घेता येते. जिथे वंचित घटकांपर्यंत आजवर कोणी पोहचले नाही तेथे पोहचून वंचितांना लाभ देण्याची ही अभिनव कल्पना गेल्या दोन वर्षांपासून राबवण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी वसंतदादा पाटील अभियांत्रिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आलम शेख, सचिव ॲड. अप्पासाहेब देसाई, नशाबंदीचे अमोल मडामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मुंबई शहरच्या सहाय्यक आयुक्त शेरे यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages