वाढत्या नागरीकरणात अग्निसुरक्षा महत्वाची - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाढत्या नागरीकरणात अग्निसुरक्षा महत्वाची - मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 8 - वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. ‘सेक्युटेक इंडिया’ सारख्या प्रदर्शनामधून विकसक, अभियंते यांच्याबरोबरच लोकांनाही अग्निसुरक्षा, त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींची माहिती मिळू शकेल. त्यामुळे अशी प्रदर्शने फार महत्वाची आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


गोरेगाव येथील बॉम्बे कन्वेंशन एक्झीबिशन सेंटर येथे आयोजित अग्निसुरक्षा विषयक ‘सेक्युटेक इंडिया’ प्रदर्शनाचे आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नॅशनल असोसिएशन ऑफ फायर ऑफिसर्सचे अध्यक्ष एम. व्ही. देशमुख, सुमित गांधी, नितीन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, अग्निसुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी नसून लोकांनीही याबाबतीत दक्ष असणे गरजेचे आहे. आपत्ती आल्यानंतर त्याचा सामना करण्यापेक्षा ती येऊ नये यासाठी दक्षता आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या क्षमता विकसीत कराव्या लागतील. वाढत्या नागरीकरणात दक्षता आणि सुरक्षितता हा महत्वाचा भाग बनला पाहिजे. त्यासाठी जोपर्यंत आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही, तोपर्यंत नागरीकरणातील आव्हानांना आपण यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबईसारख्या सागरतटीय शहरात जमिनीअभावी कमी जागेत बांधकामे केली जातात. पण काहीही झाले तरी आपणास सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. महापालिकेच्या अग्निसुरक्षा दलाने विविध क्षमता विकसीत केल्या आहेत. आधुनिक तंत्राचा वापर करुन त्यात अधिक वाढ होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

अग्निसुरक्षा ही लोकांच्या जीवनाचा भाग बनणे गरजेचे असून यासाठी समाजाने दक्ष रहावे. स्मार्ट सिटीच्या निर्मितीत लोकांची सुरक्षितता हा महत्वाचा भाग आहे. शासन, खाजगी संस्था, उद्योजक, विकसक यांच्या एकत्रीत सहयोगातून राज्यातील शहरे आणि ग्रामीण भाग हा जास्तीत जास्त सुरक्षीत करण्यासाठी कार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रदर्शनात अग्निसुरक्षाविषयक विविध यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींचे प्रदर्शन आणि विक्री सुरु आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages