बेस्टला टाळे ठोकणारा कृती आरखडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2017

बेस्टला टाळे ठोकणारा कृती आरखडा

मुंबई सतत २४ तास धावणारे शहर. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात गेल्या काही वर्षात वाहतुकीच्या साधनात मोठे बदल झाले आहेत. एकेकाळी मुंबईची लोकल ट्रेन आणि बेस्टची बस यावर अवलंबून असलेल्या प्रवाश्यांना टॅक्सी, रिक्षा, ओला उबेर सारखी खाजगी वाहने तसेच मेट्रो ट्रेन उपलब्ध झाली आहे. मुंबईत नव्याने आलेल्या वाहतुकीच्या साधनांचा मुकाबला करत लोकल ट्रेन तग लावून असताना बेस्ट बसला मात्र टाळे लावण्याची वेळ आली आहे.

लोकल ट्रेन आपल्या मार्गावरून धावत असल्याने मुंबईत असलेल्या रस्त्यांच्या जाळ्यांवरून धावण्यासाठी बेस्टला खूप मोठी संधी निर्माण झाली. बेस्टने आपले जाळे मुंबईत पसरले. परंतू बेस्ट प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे बेस्ट आर्थिक संकटात सापडत गेली. प्रवाश्यांना काय सुविधा द्यायला हव्यात, प्रवाश्यांना किती भाडे आकारले तर प्रवाशी खुशीने बेस्ट बसने प्रवास करतील याचा योग्य विचार न केल्याने बेस्टवर कर्जाचा डोंगर उभा राहिला.

मुंबईचे ट्राफिकनेही बेस्टच्या घाट्यात भर घातली. ट्रॅफिकमुळे बेस्ट बसेस वेळेवर उपलब्ध नसल्याने प्रवाश्यांनी इतर वाहतुकीची साधने वापरण्यावर भर दिला. बेस्टबसमधून एखाद्या कुटुंबाला प्रवास करावयाचा असल्यास बेस्टचे भाडे जास्त आणि खाजगी गाड्यांचे भाडे कमी लागत असल्याने बेस्टकडे प्रवाश्यांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनपासून एकाद्या जागी जाण्यास बस सेवा उपलब्ध नसल्याने त्याची जागा शेअर रिक्षा आणि टॅक्सीने घेतली.

एकेकाळी बेस्टमधून दिवसाला ४२ लाख प्रवासी प्रवास करत होते. तिकीट आणि पासची दरवाढ केल्यानंतर सध्या बेस्टने प्रवास करणाऱ्यांचा आकडा २९ लाखावर आला आहे. प्रवासी बेस्ट पासून दूर गेले यासाठी शेअर रिक्षा टॅक्सी मेट्रोला दोष देण्यात आले. मात्र बेस्टने आपले प्रवासी वाढवण्यासाठी म्हणावे तसे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. यामुळे आज बेस्ट उपक्रमाची संचित तूट २१४८ कोटी रुपये इतकी आहे. बँकांकडून, मुंबई महापालिकेकडून घेतलेले कर्ज फेडताना कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत इतकी बेस्टची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे.

बेस्टला आर्थिक मदत करावी म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकारकडे मागणी केली जात आहे. राज्य किंवा केंद्र सरकारने मदत करण्यास अद्याप पुढाकार घेतलेला नाही. बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचा उपक्रम असल्याने पालिकेने १६०० कोटी रुपये व्याजाने दिले होते. हे कर्ज फेडताना आणि त्याचे व्याजही फेडताना बेस्टची आर्थिक गणिते बिघडली आहेत. बेस्टने पुन्हा मुंबई महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. बेस्टला मदत करण्यासाठी पालिका आयुक्तांनी कृती आराखडा बनवण्यास सांगितला आहे.

बेस्टने बनवलेला कृती आरखडा बेस्ट समिती समोर सादर करण्यात आला आहे. यात बेस्ट कर्मचार्‍यांचे, अधिकार्‍यांचे विविध भत्ते बंद करण्यासोबतच उत्पन्न वाढीसाठी तिकिटांच्या, पासच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. बेस्टच्या जवळच्या अंतराच्या व इतर तिकिटांच्या दरात ४ रुपयांची वाढ करताना सामान्य प्रवासी, विद्यार्थी यांच्या पासच्या दरात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे. एसी बसच्या प्रवाश्यांच्या तिकीट दरात १० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. सध्या बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे ८ रुपये आहे. हे थेट १२ रुपये करण्यात येणार आहे.

१ एप्रिल २०१७ पासून महागाई भत्ता गोठवणे, ‘ब’ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता खंडित करणे, उपक्रमाच्या तांत्रिक ब श्रेणीतील अधिकाऱ्यांकरता विद्युत वितरण कार्यक्षम भत्ता, रजा प्रवास सहाय भत्ता, गृहकर्जावरील अर्थसहाय, दूरध्वनी देयकांची बिले शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या पाल्यांच्या वह्या, पुस्तके खरेदीवर आर्थिक मदत, शिष्यवृती योजना खंडित करणे, उपहारगृहाच्या कंत्राटदाराला देण्यात येणारे अर्थसहाय बंद करणे

वेतनश्रेणी आणि अन्य भत्ते इत्यादींच्या पुनर्रिक्षणाच्या बाबतीतील करार आहे तसाच २०२१ पर्यंत पुढे सुरु ठेवणे, ‘अ’ श्रेणीतील आस्थापनेवरील 25 पदे रद्द करणे, नियमित होणाऱ्या विविध पदांच्या भरतीला स्थगिती, सेवा सातत्य व कामांचे मूल्यांकन करून सेवा समाप्तीची योजना लागू करण्यात येणार, विद्युत पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, ऊर्जा खरेदी कराराबाबत वाटाघाटी लेखा पद्धतीत सुधारणा, खरेदी प्रक्रीयेत सुधारणा करण्याचे सुचवले आहे.

बेस्टच्या बस मार्गाचे सुसूत्रिकरण, बसताफ्यांची पुनर्रचना, वातानुकूलित बससेवा बंद करणे, भाडेतत्त्वावर बसगाड्या घेणे, प्रवास भाडयांची पुनर्रचना, बस पास दरात वाढ, विद्यार्थ्यांच्या बसपास दरात दुप्पट वाढ, आनंदयात्री योजना रद्द करणे, सेवा निवृत कर्मचाऱ्यांच्या बसपास दरात दुप्पट वाढ, पत्रकारांच्या बसपासदरात सहापट वाढ केली जाणार आहे. यामुळे ज्यांच्यासाठी बससेवा सुरु केली आहे ते प्रवासी नाराज आहेत. दोन वर्षांपूर्वी भाडेवाढी नंतर २९ लाखावर आलेली प्रवाश्यांची संख्या आणखी काही लाखांनी कमी होणार आहे.

बेस्टमधील कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे भत्ते बंद केल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. बेस्ट उपक्रम चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचारी खुश असले तर उपक्रम चालू शकतो. कर्मचाऱ्यांना नाराज करून प्रशासन आपल्या अडचणीत वाढ करत आहे. कर्मचाऱ्यांचे भत्ते व सोयी सुविधा बंद केल्याने कर्मचारी युनियनने संपाची नोटीस दिली आहे.

बेस्टने आर्थिक काटकसर करायला हवी. त्यासाठी योग्य उपाय योजना करायला हव्यात. ज्या प्रवाश्यांच्यामुळे बेस्टला उत्पन्न मिळत आहे त्यांना खुश ठेवून प्रवासी कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रवासी वाढले आणि चांगल्या सोयी सुविधा दिल्या तर बेस्टचे उत्पन्नही वाढणार आहे याकडे प्रशासनाने आणि मुंबई महापालिकेने लक्ष द्यायला हवे. तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांचे भत्ते बंद करून मार्ग निघणार नसल्याने बेस्टवरील संकटातून मार्ग काढण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे.

बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक मदत हवी म्हणून मुंबई महापालिकेने कृती आरखडा बनवायला सांगितला. हा आराखडा फक्त महापालिका प्रशासन आणि आयुक्तांना खुश करण्यासाठी बनवला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आराखड्याबाबत बेस्ट समिती सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अश्या आराखड्याला बेस्ट समितीत मंजुरी मिळू शकणार नाही. असे असताना बेस्ट प्रशासनाला काही माध्यम मार्ग काढावाच लागणार आहे. अन्यथा बेस्टला कायमचे टाळे ठोकण्याची तयारी करावी लागणार आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad