मुंबई दि. 22: बीडीडी चाळींप्रमाणेच पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज वरळीच्या जांभोरी मैदानात आयोजित “बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्यावेळी बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नायगाव, ना.म.जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळी या मुंबईच्या इतिहासाचा भाग आहेत, सांस्कृतिक घटक आहेत. येथील तीन पिढ्यांनी दु:ख भोगले आहे. आता पुनर्वसन प्रकल्पामुळे त्यांचे दु:ख लवकरच दूर होणार आहे. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. इच्छाशक्तीच्या अभावामुळेच कित्येक वर्षे चाळकऱ्यांचा हा प्रश्न रखडलेला आहे.
देशातील सर्वात मोठा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याने ते आनंदाचे क्षण आता सुरु झाले आहेत. येथील लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा आणि म्हाडाचे अधिकारी यांचे व्यवस्थित नियोजन यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. याप्रमाणेच पोलिसांच्या घरांचा प्रश्नही महत्वाचा आहे. येत्या दोन वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांनाही घरे देऊ. त्याचबरोबर अन्य जुन्या चाळी, धोकादायक इमारती यांचाही पुनर्वसनाचा कार्यक्रम शासन हाती घेणार आहे.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत प्रत्येक अधिवेशनात चर्चा व्हायची प्रत्यक्षात काहीच घडत नव्हते. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने आणि चाळीच्या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याने पुनर्विकासाकडे दुर्लक्ष झाले आता या सरकारने प्राधान्याने लक्ष घालून पुनर्विकासाच्या कामाला गती दिली आहे. या पुनर्विकासात 68 टक्के जमीन ही रहिवाशांसाठी तर उर्वरित 32 टक्के जमीन विक्रीसाठी वापरली जाणार आहे. या नव्या इमारती देशातील सर्वोत्तम इमारती असतील. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून इमारतींचे उत्तम डिझाईन तयार केलेले आहे. चाळकऱ्यांनी एवढे वर्षे दु:ख अनुभवले आता तुमच्या पुढच्या पिढ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहायचा आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, बीडीडी चाळीचा प्रश्न एक मोठे आव्हान होते. ते सरकारने स्वीकारून या कामाला गती दिली आहे. मुंबई शहरात जवळपास 16हजार मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. तिथे राहणारे सर्व मुळ मुंबईकर आहेत. त्यांनाही न्याय द्यावा लागेल.
गृहनिर्माण मंत्री महेता म्हणाले की, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला होता. यापूर्वी विधिमंडळात नुसती चर्चा व्हायची पण पुढे काही घडले नाही. ते काम फडणवीस सरकारने केले आहे.
राज्यमंत्री वायकर म्हणाले की, आजचा दिवस चाळकऱ्यांच्या आनंदाचा दिवस आहे. कित्येक वर्षाचे चाळकऱ्यांचे स्वप्नं आज पूर्ण होत आहे. त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी दु:ख अनुभवले आता पुढची पिढी तरी आनंदाने राहील. ही घरे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील, असा विश्वासही वायकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, कालीदास कोळंबकर यांनी आपल्या मनोगतात या प्रकल्पाच्या भूमीपुजनाचा आनंद व्यक्त केला तसेच मुख्यमंत्र्यांना त्यासाठी शुभेच्छाही दिल्या. प्रारंभी ढोलताशाच्या गजरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे चाळकऱ्यांनी जंगी स्वागत केले. प्रास्ताविकात म्हाडाचे उपाध्यक्ष झेंडे यांनी या पुनर्वसन प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. याच कार्यक्रमात“ उष:काल नव्या गृहनिर्माणाचा” हा माहितीपट दाखविण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन वास्तूविशारदांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी बटण दाबून ना.म.जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव येथील चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पांचे ई-भुमिपूजन केले.
या कार्यक्रमास आमदार आशिष शेलार, राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, सदा सरवणकर, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह बीडीडी चाळीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment