मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ पुस्तक चित्रांचे प्रदर्शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ पुस्तक चित्रांचे प्रदर्शन

Share This

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये १० ते १४ एप्रिल दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ पुस्तक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी केले. किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन. मगरे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून जगभरातील अनेक दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदान करण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार, त्यांच्याकडील असलेली दुर्मिळ साहित्य, त्यांचा गिटार, त्यांचे लेखणी, अभ्यासखोली, पोस्टेज स्टॅम्प, भारतीय डाक तार विभागाने १४ एप्रिल १९६६ ला जारी केलेले पोस्टकार्ड अशा अनेक दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पाच दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु ग्रंथालयात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात २०० हून अधिक दुर्मिळ पुस्तके, चित्र, दुर्मिळ लेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली विविध पत्रे, युनिव्हर्सिटी आॅफ लंडन ग्रंथालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओळखपत्र, लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स येथील ११ आॅक्टोबर १९१६ मधील विद्यार्थी पास, ५ जानेवारी १९३१ ला लंडनहून बडोदा येथील महाराजांना लिहीलेले पत्र, वसंत व्याख्यानमालेच्या निमंत्रणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चिटणीस यांनी लिहलेले १५ एप्रिल १९२७ रोजीचे पत्र, कोलंबिया विद्यापीठाचे २५ आॅक्टोबर १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहलेले पत्र, राजगृह - दादर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंकरदास बर्वे यांना ३० सप्टेंबर १९३६ ला लिहलेले पत्र. 

समता या पाक्षिकाचा २९ जून १९२८ चा पहिला अंक, रविवार ३ एप्रिल १९२७ चा बहिस्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक, मुकनायक, जनता साप्ताहिकाचे आॅक्टोबर १९५६ चे हिरक महोत्सवी विशेषांक, एनसाक्लोपिडिया आॅन आंबेडकर, आंबेडकर आॅन पॉप्युलेशन पॉलिसी, चॅम्पीअन आॅफ ह्युमन राईट्स, एनसाक्लोपिडिया आॅफ दलित एथनॉग्राफी, द आंबेडकर एरा, महात्मा फुले गौरवग्रंथ, शोधाच्या नव्या वाटा, गुलामी, नवे पर्व, महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या मसुद्याची मूळ प्रत अशा विविध ग्रंथांचा खजिना पहावयास मिळणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages