हे दोघे आरोपी लोअर परेल येथील महावीर चाळीत बोगस सॉफ्टवेअरच्या आधारे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वातानुकूलित व स्लीपर्स कोचच्या तिकिटांचे आरक्षण करत असल्याची माहिती रेल्वेच्या गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. ऐन हंगामाच्या वेळेला हे दोघे आरोपी प्रत्येक तिकिटामागे प्रत्येकी पाचशे रुपये जादा आकारून गडगंज फायदा मिळवत होते. रेल्वेच्या अधिकार्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या मदतीने लोअर परेल येथील इमारतीवर छापा टाकून या दोघा एजंटना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख १४ हजार रुपयांच्या तिकिटांचा साठा हस्तगत केला.
तत्काळ तिकिटांचे आरक्षण देण्याचे काम हे दोघे आरोपी करत असत. त्यासाठी ते मोठी रक्कम गरजू प्रवाशांकडून घेत असत. रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत सर्व तिकिटे संपल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर लागत असत. बोगस सॉफ्टवेअर व 'आयडी'चा वापर करून सर्व तिकिटे हे एजंट आपल्या नावावर खरेदी करत असत. नंतर गरजू प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे जादा पैसे आकारून या दोघा आरोपींनी गडगंज संपत्ती मिळवली आहे. या दोघांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोघा आरोपींची कसून चौकशी चालू आहे.