![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggIYxBSdb1VmM_S4Hv2Qw4Lswb7U2E8-tZi0qyOwHvgGwCnwNO_jjz-JeKdZe_UFhGhpQ2lSg7voRQ9_VxQRHy4aBFpwcAMaA9GB2-I42vxwz41gTOcWVUf_6zAPSJys-jGe7DTkM2oDw/s640/blob_1492749679309-.jpg)
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी प्रभार रचनेत बदल करण्यात आला. या बदलामुळे वडाळा येथील पाच उद्यान व त्याला लागून असलेली पारसी कॉलनी मात्र दोन नगरसेवकांच्या वॉर्डात विभागली गेली आहे. यामुळे येथील नागरिकांना सोयी सुविधा देताना अनेक प्रकारे त्रास होत असल्याने नागरिकांना सोयी सुविधा देता याव्यात म्हणून पाच उद्यान व पारसी कॉलनीचा १७८ या वॉर्डात समावेश करून तो वॉर्ड एफ दक्षिण विभागात समावेश करावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
मुंबईच्या माटुंगा येथील पाच उद्यान हे प्रसिद्ध असलेले उद्यान आहे. याच्याच बाजूला पारसी समाजाची मोठी वसाहत आहे. हे पाच उद्यान व बाजूला असलेली पारसी वसाहत प्रभाग फेररचना करताना महापालिकेच्या १७७ व १७८ वॉर्डमध्ये विभागली गेली आहे. यामुळे येथील नागरिकांना सोयी सुविधा देताना व नागरेवकांकडून कामे करून घेताना अनेक अडचणी येत आहेत. प्रभाग रचना बदलताना झालेल्या चुकीमुळे रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने येथील स्थानिक नागरिकांच्या मंचरजी रेसिडन्स असोसीएशनने महापालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना पत्र देऊन यामधून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या मागणीनुसार पाच उद्यान व पारसी कॉलनीचा वॉर्ड क्रमांक १७७ मधून वगळून वॉर्ड क्रमांक १७८ मध्ये समावेश करावा, एफ उत्तर विभागात १० वॉर्ड असून त्यातील एक वॉर्ड कमी करून एफ दक्षिण विभागात फक्त सात वॉर्ड असल्याने एफ दक्षिण विभागात १७८ हा वॉर्ड समावेश करावा अश्या मागण्या रवी राजा यांनी केल्या आहेत. वॉर्ड क्रमांक १७८ मध्ये अर्धी पारसी कॉलनी, अर्धे पाच उद्यान, सहकार नगर, जे. बी. वाचावाडीया शाळा, दादर जिमखाना, दादर टीटी हे विभाग येतात. यामुळे या वॉर्ड मध्ये सर्व पारसी कॉलनी व पाच उद्यानचा समावेश करणे योग्य ठरेल असे रवी राजा यांनी म्हटले आहे. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीतही चर्चा झाल्याचे रवी राजा यांनी सांगितले.