मुंबईत एका महिन्यात 706 तर दिवसाला 22 दुर्घटना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2017

मुंबईत एका महिन्यात 706 तर दिवसाला 22 दुर्घटना

एका महिन्यात 33 जखमी तर 8 जणांचा मृत्यू -
मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या आर्थिक राजधानीत दुर्घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. या दुर्घटनांमध्ये आग लागणे , घराची पडझड , वाहन अपघात, समुद्रात पडून मृत्यू होणे, आदिंसारख्या दुर्घटनांचा समावेश आहे. मुंबई अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालानुसार जानेवारी या एका महिन्यात 706 दुर्घटना घडल्या. त्यात 33 जण जखमी झाले असून 8 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.


मुंबई पालिका अग्निशमन दलाने 1 ते 31 जानेवारी 2017 या महिन्यातील दुर्घटनांचा अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालानुसार जानेवारी महिन्यात विविध प्रकारच्या 706 दुर्घटना घडल्या. त्यात 33 जण जखमी झाले असून 8 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दर आठवड्याला सरासरी 154 दुर्घटना घडत आहेत व त्यामध्ये दोन मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत. तर दिवसाला सरासरी 22 -23 दुर्घटना घडून एक जण जखमी होत आहे असे अहवालात म्हटले आहे. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत आग लागणे, नाल्यात पडणे, वाहन अपघात, समुद्रात बुडणे, घराच्या भिंतीची पडझड, अशा 312 दुर्घटना घडल्या आहेत. त्यात 16 जण जखमी झाले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी 16 लोकांमध्ये 15 पुरुष व एक महिला जखमी झाले आहेत तर तीन पुरुष मृत्यू झाले आहेत. या तीन पैकी एकाचा समुद्रात बुडून तर दुस-याचा नाल्यात पडून आणि तिसर्‍याचा घरात पडून मृत्यू झाला आहे. तसेच 15 ते 31 जानेवारी या कालावधीत 394 दुर्घटना घडल्या आहेत त्यामध्ये 17 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृत्यूपैकी एकाचा घरात मृत्यू झाला आहे. दुसऱ्याने आत्महत्या केली आहे तर उर्वरित तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. एका महिन्यात 706 दुर्घटना घडत असल्याने मुंबईकरांसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad