सायन-कोळीवाडा, चेंबूर येथील निर्वासित वसाहतींच्या पुनर्विकास संदर्भात मंगळवार दि.२३ रोजी पाटील यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आमदार कॅप्टन आर.तमीलसेल्वन, वित्त विभाग सहसचिव वि.र.दहिफळे, मुंबई मनपाचे चं.पु.मेतकर, किशोर शहदादपुरी, रमेश कुलकर्णी, गृहनिर्माण सहसचिव बी.जी.पवार आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री पाटील म्हणाले की, सायन-कोळीवाडा, चेंबूर येथील निर्वासित वसाहतींचा विकास म्हाडातर्फे करण्याचे यापूर्वी प्रस्तावित होते. परंतु, हा विकास म्हाडातर्फे करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने यासंदर्भात पुन्हा इतर पर्याय तपासण्यात आले. बीडीडी चाळींचा विकास करतांना इमारती आणि जमीन दोन्ही शासन मालकीच्या होत्या आणि रहिवासी केवळ भाडेकरू होते. तर सायन-कोळीवाडा, चेंबूर वसाहतीच्या इमारतीमधील फ्लॅट निर्वासितांना मालकी हक्काने वाटप केले आहे. त्याची किंमत वसूल केली आहे. त्या सदनिकांच्या सनदा देखील त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे वसाहतींच्या पुढील विकासासाठी इमारतीखालील व सभोवतालच्या जागेचे क्षेत्र किती अनुज्ञेय ठरेल हे बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय वास्तूविशारद यांच्याकडून निश्चित करून त्या इमारतीच्या गृहनिर्माण संस्थांना सनदा द्याव्या. असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. सायन-कोळीवाडा, चेंबूर येथील निर्वासित वसाहतधारकांनी वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करण्याचा ठराव केल्यास त्यांचा विकास म्हाडामार्फत करण्यात यावा, अशा सूचना देखील पाटील यांनी दिल्या.