रस्ते दुरुस्ती व नालेसफाईची डेडलाईन पाळण्यात महापालिका अपयशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2017

रस्ते दुरुस्ती व नालेसफाईची डेडलाईन पाळण्यात महापालिका अपयशी


मुंबई / प्रतिनिधी -
पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईमधील रस्ते आणि नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ची डेडलाईन महापालिका प्रशासनाने जाहीर केली होती. प्रशासनाने जाहीर केलेली ही डेडलाईन पाळण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. मुंबई महापालिका नालेसफाईची कामे योग्य रित्या पूर्ण करत नसताना डेडलाईन पाळण्यातही अपयश आल्याने खुद्द नगरसेवकांनी खंत व्यक्त केली आहे.

मुंबईमधील रस्ते आणि नालेसफाईची पाहणी करण्यासाठी बुधवारी (३१ मे) पत्रकारांचा दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्या दरम्यान महापालिकेने रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाई कशी केली हे दाखवण्याचा प्रयतन करण्यात आला. एफ दक्षिण मधील रोड नंबर ३७ पालिकेने महिन्याभरापूर्वी केल्याचे अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र येतील स्थानिकांनी हा रस्ता ४ ते ५ महिने आधीच बनवण्यात आला असल्याचे सांगण्यात आल्याने पालिका अधिकाऱ्यांनी एक महिन्यापूर्वी काम झाल्याचा दावा खोटा ठरला आहे. महापालिकेचे मुख्यालय मुंबई शहर विभागात आहे. या शहर विभागातील वडाळा ब्रिज चर्च रोड, दादर भोईवाडा येथील जी. डी. आंबेकर मार्ग, परेल येथील जेरबाई वाडिया मार्ग या रस्त्यांची कामे अद्याप सुरु असून डेडलाईन संपली तरी याला रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत होती.

दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्यासह नालेसफाईची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान वडाळा येथील कोरबा मिठागर नाला साफ झाला नसल्याचे समोर आले होते. आज बुधवारी याच नाल्याला पुन्हा भेट दिली असता आहे तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसली. पत्रकार येणार म्हणून कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा न देताच, सुरक्षेची काळजी न घेताच या नाल्यात सफाईसाठी उतरवण्यात आले होते. या बाबत स्थानिक नगरसेविका पुष्पा कोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना ओरडून ओरडून सांगितले तरी नालेसफाई केली जात नसल्याची खंत व्यक्त करत या पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना त्रास होणार असल्याची चिंता कोळी यांनी व्यक्त केली. तर गोरेगाव येथील भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी इतर ठिकाणी कामे सुरु असली तरी पी दक्षिण आणि के पश्चिम वॉर्ड मधील भांडणामुळे अद्याप ओशिवरा नदीमधून गाळ काढला गेला नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

मुंबईत पाणी साचणारच नाही असे बोलू शकत नाही - 
मुंबईतील मिठी नदीची सफाई पूर्ण झाली आहे. मेजर नाल्यांची सफाई ९४ टक्के तर रस्त्या बाजूच्या नाल्याची ९५ टक्के सफाई झाल्याने पाणी साचणार नाही असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र मुंबईत पाणी साचणारच नाही असे बोलू शकत नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी २१९ ठिकाणी ३१३ पंप बसवण्यात आले आहे. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचल्यास ६ पम्पिंग स्टेशन सुरु राहणार असून त्यामधून एका सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा उपसा होणार आहे. हे सर्व पंप एकाच वेळी सुरु ठेवण्याची गरज भासणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

रस्ते दुरुस्तीत अपयश पालिकेची कबुली -
रस्ते दुरुस्तीची कामे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. इतर जी कामे अपूर्ण आहेत ती कामे येत्या २ ते ३ दिवसात पूर्ण करू असे प्रशासनाने म्ह्टले आहे. दरम्यान हा दावा करताना दिलेल्या आकडेवारी नुसार प्रायोगिक १ मधील ११० पैकी ७, प्रायोगिक २ मधील २४८ पैकी १६८ व प्रोजेक्ट रोड मधील ४१५ पैकी ९२ रस्त्यांची कामे बाकी असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जी कामे बाकी आहेत ती येत्या दोन - तीन दिवसात पूर्ण करण्यात येतील. तसेच कामे बाकी राहिलेले इतर रस्ते रहदारीसाठी खुले केले जाणार आहेत.

रस्ते दुरुस्तीची आकडेवारी -
रस्त्यांचा प्रकार -  रस्ते  -  दुरुस्ती - बाकी
प्रायोगिक १         ११०      १०३         ७
प्रायोगिक २         २४८       ८०      १६८
प्रोजेक्ट               ४१५      ३२३      ९२

खड्डे बुजवण्यासाठी नवे तंत्रज्ञान -
पावसाळयात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याची तक्रार नेहमीच असते. यावर्षी खड्डे पडू नयेत याची काळजी घेण्यात आली आहे. मागील वर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी पूर्ण पट्टा दुरुस्त करून घेण्यात आला आहे. या नंतरही खड्डे पडल्यास पाऊस जोरात असतानाही खड्डे बुजवण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यासाठी इकोग्रीन इंफ्रा व स्मार्टेज प्रोडक्ट्स या दोन कंपन्यांकडून ७० लाख रुपये खर्चून ३८ टन मटेरियल खरेदी करण्यात आले आहे. वेळ पडल्यास पालिकेच्या अस्फाल्ट प्लांट मधूनही खड्डे बुजवण्यासाठी डांबर मिश्रीत खडी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Post Bottom Ad