पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा, मोगरगा गावाला भेट देण्याचे आदेश - मुंबई (प्रतिनिधी ) - मराठवाड्यातील परभणी जिल्हात पूर्णा तसेच लातूर जिल्ह्यातील मोगरगा गावात झालेल्या बौद्धावरील अत्याचाराची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दखल घेतली आहे, पूर्णा प्रकरणी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करतानाच मोगरगा बौद्ध बहिष्कार प्रकरणी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना गावाला भेट देण्याचे आदेश बडोले यांनी दिले आहेत.
पूर्णा येथील भीमजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफ़ेक प्रकरणी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करून संबंधितांना न्याय देण्याच्या सूचना बडोले यांनी केल्या. पीडित जखमींना शासकीय मदत देण्याबाबत काय करता येईल यासंदर्भात त्यांनी आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तसेच संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या. लातूर जिल्ह्यातील मोगरगा गावात जयंती साजरी झाल्यानंतर गावात उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी लातूरच्या सहाय्यक आयुक्तांना केल्या.