मुंबई - सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन - अ बिलियन ड्रिम्स' हा चित्रपट महाराष्ट्र सरकारनेही करमुक्त म्हणून जाहीर केला. सचिनने क्रिकेट विश्वात दिलेल्या भरीव योगदानाचा सन्मान करत महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी हा निर्णय घेतला.
सचिनचा प्रेरणादायी जीवनपट थिएटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, हा सरकारचा मूळ उद्देश आहे. याआधी ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांनीही हा चित्रपट करमुक्त म्हणून घोषित केला होता. तरुणांना सचिनच्या जीवन चरित्रातून प्रेरणा मिळेल, या हेतूने विविध राज्यांनी चित्रपटाला करमुक्त करत सचिनच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक जेम्स एरस्किनने दिग्दर्शन व लेखनाची धुरा सांभाळलेला 'सचिन : अ बिलियन ड्रिम्स' हा चित्रपट शुक्रवारी सर्व थिएटरमध्ये दाखल झाला. जगभरातील तब्बल २८00 हून अधिक चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखल झाला आहे. सचिनने क्रिकेट खेळताना असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. त्यामुळे त्याच्या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.