मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या वेगवान वाहतुकीसाठी आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड बांधण्याआधी भूशास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई आय.टी.आयच्या संशोधकांकडून ही चाचणी केली जाणार असून यावेळी दगड, मातींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे.
मुंबई शहराची वाहतूक वेगवान व्हावी, यासाठी कोस्टल रोड हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या रोडबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या असून त्यानुसार रोडची निर्मिती केली जाणार आहे. समुद्रात भर घालून त्यातून कसा मार्ग काढायचा, मासेमारीवर परिणाम होऊ नये, तेथील स्थानिकांचे रोजगार कसे वाचतील, पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी काय करावे लागेल, याबाबतचे मार्गदर्शन सल्लागाराकडून घेण्यात येत आहे. चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. मे. डी.बी.एम जिओटेक्नीकल अॅंड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. हा कंत्राटदारावर प्रिंसेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे- वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत भूशास्त्रीय चाचणीचे काम सोपवले आहे. तर मे. एईकॉम. एशिया कं. लि. या कंत्राटदाराने गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानच्या बोगद्याची भूशास्त्रीय चाचणी करण्याचे सूचवले आहे. यानुसार पालिकेने कोस्टल रोडच्या संपूर्ण मार्गाची सरचार एॅब्रेसिव्हिटी इंडेक्स चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आय.आय. टी. च्या संशोधकांकडून चाचणी करवून घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. एका महिन्याच्या कालावधीकरिता हे काम दिले जाणार आहे. त्यानुसार त्यांच्याकडून खर्चाचा अहवाल मागवला असून 25 नमुन्यांकरिता एक लाख 12 हजार 500 रुपये अधिक सेवाकर घेण्याचे आय.आय.टी निश्चित केले आहे. येत्या बुधवारी स्थायी समितीत प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.