मुंबई, दि. 5 June 2017 : राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव,विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातील नवीन पदे भरणे, कार्यालयासाठी जागा निश्चित करणे व इतर सर्व प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग कार्यान्वित करण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वित्त विभागाचे सचिव गिरीराज सिंह,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, विजा, भजा, इमाव, विमाप्र कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
हा नवीन विभाग सुरू करण्यासंबंधी सुरू असलेल्या बाबींचा आढावा घेतल्यानंतर प्रा. शिंदे यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार या विभागासाठी ५१ नव्याने पदे निर्माण करण्यात येणार आहे. त्यात २० पदे सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात येणार असल्याने ती तात्काळ वर्ग करण्यात यावी, तसेच इतर ३१ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित करण्यात यावी. त्यात नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या काही अधिकाऱ्यांचा देखील तात्पुरत्या स्वरूपात समावेश करावा, तसेच ३१ पदांची समांतर भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात यावी, ही सर्व प्रक्रिया एकमेकांशी समन्वय साधून आठ दिवसात पार पाडावी, असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.
विभाग कार्यान्वित करण्यासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करून त्याठिकाणी लागणारे साहित्य तात्काळ खरेदी करावे. तसेच सामाजिक न्याय विभागाकडून हस्तांतरित करावयाचे दस्ताऐवज देखील लवकर हस्तांतरित करावेत असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. सेवानिवृत्त अधिकारी घेताना ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याची खात्री करून घ्यावी आणि लिपीक,टंकलेखक ही पदे बाहेरील यंत्रणा वापरून भरता येतील का, याची देखील चाचपणी करण्याचे निर्देश प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले.