मुंबई पोलिस यांच्याकडे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे बुलेटप्रूफ जॅकेटची आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागितली होती. दरम्यान, माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे मुंबई हल्ल्याच्यावेळी जखमी झाल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. त्यावेळी त्यांनी घातलेले बुलेटप्रूफ जॅकेट तेथील सफाई कामगाराने त्यांच्या कपड्यांसह अंगावरुन काढून कच-यांत टाकले, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश सपकाळ यांनी गलगली यांना दिली.
बुलेटप्रूफ जॅकेटचा सर्वतोपरी शोध घेण्यात आला परंतु ते शेवटपर्यंत मिळून आले नाही. बुलेटप्रूफ जॅकेट न सापडणे आणि कचऱ्यात टाकणे, ही बाब निष्काळजीपणाचा कळस आहे. त्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेटची गुणवत्ता आणि मजबुतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जर करकरे यांनी वापरलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटची तपासणी झाली असती तर जॅकेट खरेदीमध्ये झालेला गोलमाल उघडकीस आला असता, असे गलगली यांचे म्हणणे आहे.
