मुंबई / प्रतिनिधी -
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रात शितल म्हात्रेंनी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.
“मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, या काळात महिलांना वेदना सहन कराव्या लागतात. महिला आपल्याला होणारी वेदना कोणालाही सांगू शकत नाहीत. म्हणूनच महिलांना समजून घेण्याची गरज आहे. “महिला कामाच्या ठिकाणी ८ ते ९ तास काम करतात. मात्र पाळीच्या दिवसात काम करणे थोडे कठीण जातं. यासाठी ही सुट्टी गरजेची आहे; प्रसूतीनंतर महिलांना ६ महिन्यांची सुट्टी देण्यात आली आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी काही खाजगी कंपन्यांनी महिलांना सुट्टी जाहीर केलीये. जगभरात अनेक देशांमध्ये मासिक पाळीत महिलांना सुट्टी दिली जाते. इटली, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि तैवानमध्येही मासिक पाळीची सुट्टी दिली जाते. त्याचप्रमाणे देशात सध्या काही खासगी कंपन्या आपल्या महिला कर्मचाऱ्यांना अशी सुट्टी देत आहेत. मग मुंबईतही मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी का देऊ नये? असा प्रश्न उपस्थित करत या सुट्टीचा गैरवापर होऊ नये म्हणून याबाबत नियमावली बनवली जावी अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे.