बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीला मंजुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीला मंजुरी

Share This

रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश - 
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षिकांचे व मदतनिसांचे मानधन अत्यल्प असल्याने हे मानधन वाढवावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणी संदर्भात रिपब्लिकन सेनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालिका प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव नुकत्याच संपन्न झालेल्या स्थायी समिती बैठकीत सादर केला असता त्याला स्थायी समितीने मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता पालिका सभागृहाच्या मंजुरीची औपचारिकता बाकी राहीली आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर मानधनात वाढ केली जाणार आहे अशी माहिती कामगार नेते रमेश जाधव यांनी दिली.

सन २००७-०८ पासून खासगी संस्थांच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरु आहेत. या बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षकांना सुरुवातीला प्रति महिना १५०० रुपये, तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन दिले जात होते. सन २००९-१० मध्ये या मानधनात वाढ करून शिक्षिकांचे मानधन २ हजार रुपये तर मदतनिसांचे मानधन १ हजार रुपये करण्यात आले. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये या शिक्षक व मदतनिसांचे मानधन ३ हजार व १५०० रुपये एवढे करण्यात आले होते. सध्या वाढत्या महागाईचा विचार करता देण्यात येणारे मानधन अल्प असल्यामुळे सन २०१७-१८ मध्ये बालवाडीच्या शिक्षकांना ५ हजार रुपये तर मदतनिसांना ३ हजार एवढे मानधन प्रति महिना देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी केली होती. या मागणीनुसार पालिका प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे मंजुरी साठी सादर केला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली आहे. बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या मानधनवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीवर ४ कोटी १३ लाख २८ हजार रुपयांचा भार पडणार आहे.

बालवाडीमधील अंगणवाडीमधील शिक्षिका व मदतनिसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी, मानधनात वाढ करावी, विद्यार्थ्यांना खाऊ व चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेने सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. पाठपुरावा सुरु असताना जेष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांचे मार्गदर्शन तसेच पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिन सावंत व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभल्याने मानधन वाढीचा प्रश्न सोडवण्यास यश आल्याचे रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते रमेश जाधव यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages