मराठी कलाकार ‘बेस्ट’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनणार -
मुंबई / प्रतिनिधी - आर्थिक तोट्यातील ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी मराठी भाषिक प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अविनाश नारकर यांच्यासारखे दिग्गज कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. ‘बेस्ट’च्या गाड्यांमधून सुरक्षित प्रवास करा, ‘बेस्ट’ची वीज वापरा असा संदेश हे कलाकार देणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन कलाकार स्विकारणार नाहीत. हे कलाकार ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून काम करणार आहेत अशी माहिती बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सध्या हालाखीची बनली आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांना आकर्षित करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहे. या योजनांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी मराठी कलाकारांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिग्गज मराठी कलाकारांना पुढाकार घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. याला कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ‘बेस्ट’चे कर्मचारी राहिलेले आणि सध्या मराठी सिने-नाट्य सृष्टीत नामवंत असलेले अभिनेते प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अतुल तोडकर, शीतल शुक्ल यांनी ‘बेस्ट’चा प्रचार आणि प्रसारासाठी नि:शुल्क योगदान देण्यासाठी तयारी दर्शवल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
‘बेस्ट’च्या माजी कर्मचार्यांशिवाय सध्याचे आघाडीचे कलाकार अभिनेता आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, सुबोध भावे हेदेखील ‘बेस्ट’चा प्रचार आणि प्रसारासाठी योगदान देणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत ‘बेस्ट’ बसमध्ये लावण्यात आलेल्या टीव्हीवरून प्रवाशांना जास्तीत जास्त ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येईल. बस गाड्यांवर पोस्टर लावून प्रवाशांना ‘बेस्ट’कडे आकर्षित केले जाईल. तसेच मुंबईभरातील ‘बेस्ट’ बस स्टॉपवर यासाठी पोस्टर्स लावून ‘बेस्ट’च्या उपक्रमांचा प्रसार केला जाणार आहे. ७ ऑगस्ट या ‘बेस्ट’ दिनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल असे कोकीळ यांनी सांगितले.