पालिकेच्या आरोग्य विभागात बनावट कागदपत्राव्दारे कंत्राटाचे वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2017

पालिकेच्या आरोग्य विभागात बनावट कागदपत्राव्दारे कंत्राटाचे वाटप


सखोल चौकशी करण्याची नगरसेवकांची मागणी - 
मुंबई -- मुंबई महापालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात थ्री डोम ऑपरेशन लाईट खरेदीसाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी बुधवारी स्थायी समितीत याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधत या प्रकारणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान याबाबत संपूर्ण माहिती येत्या बैठकीत प्रशासनाने सादर करावी असे निर्देश अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदीसाठी आवश्यक असलेले उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र (सीई) सादर करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने भलताच तांत्रिक अहवाल सादर केला. यात बनावट कागदपत्रे सादर करून हे कंत्राट सहजरित्या मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट कागदपत्रे सादर करूनही याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला आहे, त्यामुळे असे कंत्राट कोणत्या अधिका-यांनी दिले, शिवाय बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवणा-या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्य़ाव्दारे मागणी केली. या मुद्द्याला नगरसेवकांनी पाठींबा देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यापूर्वीही आरोग्य विभागात बनावट कागदपत्रे देऊन कंत्राटे मिळवली गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांना मान्यता देऊन कंत्राटे कशी दिली जातात, असा सवाल विचारत प्रशासनाला धारेवर धरले.

दरम्यान या कंत्राटदाराने सीई प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे निविदेमधील अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. मात्र तरीही संबंधित कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. बनावट कागदपत्रे सादर करून आरोग्य विभागात देण्यात येणारी कंत्राटाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

सीआयडी चौकशी करा -
आरोग्य विभागात कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली जातात. ज्या कंत्राटदाराने अशा प्रकारे कंत्राट मिळवले त्याच्यावर एफआयआर दाखल करून सीआयडी चौकशी करावी.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते

Post Bottom Ad