मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिकासिक इमारतीचे १२५ व्या वर्षात पदार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिकासिक इमारतीचे १२५ व्या वर्षात पदार्पण

Share This

मुंबई / प्रतिनिधी - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील इमारती ३० ते ३५ वर्षात कोसळून नागरिकांचा मृत्यू होत असताना मुंबई महापालिकेचा कारभार ज्या इमारतीमधून हाकला जात आहे अश्या महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला ३१ जुलैला २०१७ ला १२४ वर्षे पूर्ण होत आहेत. १ ऑगस्ट पासून हि इमारत आता १२५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त महापालिकेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

सन १८६६ मध्ये महापालिकेचे कार्यालय गिरगावमधील एका साध्यासुध्या इमारतीमध्ये होते. १८७० मध्ये ते एस्प्लनेड येथील एका इमारतीमध्ये हलविण्यात आले. पुढे ९ डिसेंबर १८८४ ला मुंबई महापालिकेच्या भव्य वास्तूचे बांधकाम सुरू झाले. विख्यात वास्तुविशारद एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी या इमारतीचे संकल्पचित्र तयार केले होते. गॉथिक शैलीतील ही इमारत वेळेत बांधणे हे त्यावेळी एक आव्हान होते. हे आव्हान तत्कालीन अध्यक्ष थॉमस ब्लॅनी, आयुक्त हॅरी अ‍ॅक्वर्थ, बांधकाम खात्याचे निवासी अभियंता रावबहाद्दूर सीताराम खंडेराव यांनी स्वीकारले तर महात्मा फुले यांचे निकटवर्तीय व्यंकू बाळाजी यांनी या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेऊन हे आव्हान पूर्ण केले होते. या इमारतीचा अंदाजित खर्च ११ लाख ८८ हजार ८२ रुपये इतका होता. हे काम व्यंकू बाळाजी यांनी अंदाजित खर्चापेक्षा कमी म्हणजेच ११ लाख १९ हजार ९६९ रुपयात या इमारतीचे बांधकाम केले होते. सदर इमारत १८९३ साली नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण करण्यात आले होते.

१८४५ साली कायद्याद्वारे स्वतंत्र म्युनिसिपल फंड निर्माण करण्यात आला आणि सात सदस्यांच्या माध्यमातून नागरी सोयीसुविधांची पाहणी केली जाऊ लागली. १८५८ साली ही व्यवस्था बदलून तीन आयुक्त नेमून त्यांना शहराची व्यवस्था पाहण्याचे अधिकार देण्यात आले. पुढे १८७२ साली ही संस्था करदात्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे एक कॉर्पोरेशन अस्तित्वात आले, तर लोकशाही पद्धतीवर आधारित महानगरपालिकेची पहिल सभा ४ सप्टेंबर १८७३ रोजी भरली होती. १८८८ मध्ये महापालिका, स्थायी समिती आणि पालिका आयुक्त अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. १९२२ पर्यंत केवळ करदात्यांनाच मतदानाचा अधिकार होता. त्यात बदल करून भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. १९३१ पर्यंत प्रथम नागरिकाला ‘अध्यक्ष’ हे नामाभिधान होते ते बदलून ‘महापौर’ असे करण्यात आले.

या इमारतीमधून गेले सव्वाशे वर्ष मुंबईच्या नागरी जीवनाशी संबंधित विषयांचा कारभार हाकला जात आहे. या इमारतीच्या बांधकामाला ३१ जुलै १९९३ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली होती. २४ एप्रिल २००५ साली या इमारतीला हेरिटेज दर्जा देण्यात आला असून हेरिटेज २ ए चा दर्जा देण्यात आला आहे. अश्या या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीला ३१ जुलै २०१७ ला १२४ वर्षे पूर्ण होऊन १ ऑगस्ट पासून हि इमारत १२५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. १२५ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने इमारतीच्या आतील बाजूस रंगरंगोटी करून इमारत सजवण्यात आली आहे. तर इमारतीच्या बाहेरील बाजूस विविध रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. आता पर्यंत रात्रीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विविध रंगाच्या रोषणाईने सजवण्यात येत होते. अशीच रोषणाई आता महापालिका मुख्यालयावरही करण्यात आली असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरोबर आता महापालिका मुख्यालयाही नागरिकांचे लक्ष केंद्रित करून घेत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages