मुंबई, दि.24 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधानभवन येथून करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित होते.
या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील गातेगावातील शेतकऱ्यांनी या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या प्रक्रियेमुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहचण्यास मदत होईल. राज्यातील 26 हजार आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा 25 हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मदत देणारे हे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचता येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात येणार आहे. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.