मुंबई / प्रतिनिधी - एकीकडे मुंबई महापालिकेकडून झोपड्यांवर कारवाई केली जात असताना मुंबई मधील इमारतीमधील अनधिकृत बांधकामाकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सुमारे 8 हजार 772 इमारतींमध्ये एफएसआयचे उल्लंघन तसेच विना परवाना फेरबदल, वाढीव बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
मुंबईतील अनेक इमारतीत नियम धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात आल्याच्या तक्रारी पालिकेकडे केल्य़ा जातात, पालिका तक्रारीनंतर अशा इमारतींची पाहणी करून कारवाईसाठी यादी करते. मात्र कारवाई होत नसल्याने अनधिकृतपणे वाढीव बांधकामांचे प्रमाण वाढत चालले आहे. 17 मजल्याचे बांधकाम करून त्यात वाढीव बांधकाम केल्याच्या तब्बल 8772 इमारती आहेत. यामध्ये 1955 रहिवासी इमारतीत एफएसआयचे उल्लंघन, तर 3232 इमारतीत फेरबदल तसेच वाढीव बांधकाम केल्याच्या सुमारे 8772 इमारतींची प्रकरणे आहेत. महापालिकेच्या 24 वॉर्डातील सर्वात जास्त भांडूपमध्ये सुमारे 1113 इमारतीमध्ये असे बदल करण्यात आले असले तरी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एच / पश्चिम विभागामध्ये 825, भायखळा परिसरात 778, इमारतींचा समावेश आहे.
पालिका अशा इमारतींना नोटिसा पाठवते. मात्र या नोटिसांना केराची टोपली दाखवण्यात येते. इमारतीत विना परवाना बांधकाम करणा-य़ांना एमआरटीपी अॅक्टनुसार कारवाई केली जाते. यांमध्ये नियमभंग करणा-यांना तुरुंगाची सजाही होऊ शकते.मात्र राजकीय दबावामुळे ही कारवाई होत नसल्याची स्थिती आहे. पालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु असते. य़ामध्ये अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होते. तसेच अधूनमधून काही इमारतीतही कारवाई केली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आदेश असूनही वॉर्ड पातळीवर ही कारवाई ठोसपणे केली जात नाही, अशा तक्रारी आहेत.