मुंबई - चीनमधून आयात होणाऱ्या विविध घातक कीटकनाशके आणि अनधिकृत रसायनांचा वापर केलेल्या अगरबत्त्या आणि धूप ग्राहकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे, होम इंसेक्ट कंट्रोल असोसिएशनने (एचआयसीए) जाहीर केले आहे. चीनी अगरबत्त्या विकून छोटे व्यापारी येथील ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. यामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांचा रोजगारही नष्ट होत असून, कर चुकवेगिरीद्वारे देशाचेही आर्थिक नुकसान होत आहे.
घरगुती वापराच्या कीटकनाशकांच्या बाबतीत सर्वसामान्य ग्राहकांना सुशिक्षित व जागरूक करण्याची जबाबदारी असोसिएशनने उचलली आहे. विविध कंपन्यांच्या नावांनी ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर, त्यात सिंट्रोनेला (नैसर्गिक कीटकनाशक) वापरण्यातच आले नसल्याची माहिती परीक्षणात समोर आली आहे. फेनोबुकार्ब नावाचे घातक कीटकनाशक यात मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय याचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही असोसिएशनने या वेळी केला आहे.
एप्रिल २०१५ मध्ये भारतीय संसदेचे (कॉंग्रेस) सदस्य हुसेन दलवाई यांनी संसदीय चर्चेदरम्यान, एक महत्वाची बाब समोर आणली होती. ती म्हणजे, अगरबत्ती किंवा धुप सारखे सुवासिक वस्तू भारतात चीनमधून आयात केल्या जात असून त्यांच्या उत्पादनादरम्यान काही घातक रसायने मिसळून व भारतात आणून त्यांना पुन्हा पॅकबंद केले जाते. या वस्तू विकण्यासाठी विविध ब्रॅण्ड्सच्या नावांखाली बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पानपट्टीची टपरी किंवा रस्त्यालगतचे दुकान या ठिकाणीही त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. विविध ब्रँडच्या नावाखाली बाजारात सहज विक्री होण्यासाठी या वस्तू पानपट्टीची टपरी किंवा रस्त्यालगतच्या दुकानांत विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. विशेषत: कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत अशा प्रकारच्या अगरबत्त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.