
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत पावसाळया आधीच स्वाईन फ्लू आणि इतर आजार वाढले होते. जून पर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूने १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्याच्या १५ दिवसात मुंबईत लेप्टोचे २ आणि स्वाईन फ्लूचे ५ मृत्यू झाले आहेत. डेंग्यूचे २८ आणि हेपटायटीसचे ८८ रुग्ण पालिका व सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच गॅस्ट्रोचे ५४४, हिवतापाचे ३०९ आणि स्वाईन फ्लूचे २५० रुग्ण आढळले आहेत. काविळीचाही मानखुर्दमध्ये रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे.
१ ते १५ जूलैपर्यंत डेंग्यूची शक्यता असलेले १२५ रुग्ण आढळले असून, ते पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन हजार २३० घरांची तपासणी केली. एन्प्लुएंझाग्रस्त १८ रुग्ण आढळल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. लेप्टोमुळे मृत्यू झाल्याने ८६० घरांची पालिकेने तपासणी केली. १ जानेवारी ते १५ जूलैपर्यंत एन्प्लुएंझाचे ५५ हजार ५३१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार ८६९ रुग्णांवर ‘आॅसेल्टामिवीर’ उपचार करण्यात आले. ८७४ रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली. त्यापैकी काही रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.
वांद्रे येथील ५७ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला आहे. बोरिवली पश्चिम येथील ४१ वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात एन्प्लुएंझाने मृत्यू झाला आहे. गोरेगाव पूर्व येथील ४५ वर्षांच्या पुरुषाला स्वाईन झाल्याचे आढळल्यावर सुरुवातील खाजगी रुग्णालयात, नंतर सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयात दाखल केले. सेप्टिकसेमिया आणि एन्फलुएंझाने त्याचा मृत्यू झालं आहे. परळ येथील ६५ वर्षीय महिलेला आधी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर बेशुद्धावस्थेत सार्वजनिक रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा मृत्यू झाला आहे. तर मानखुर्द येथील चार वर्षांच्या बालिकेला खाजगी रुग्णालयात दाखल केले पण स्थानिक डॉक्टर निदान करु न शकल्यामुळे तिला सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले पण तेथे तिचा मृत्यू झाला.
स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या पाचपैकी चार रुग्णांवर ‘आॅसेल्टामिवीर’ हे प्राथमिक उपचार सुरु करण्यास विलंब झाल्याने त्यांनी जीव गमावला. हे चार रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल झाल्यावर ‘आॅसेल्टामिवीर’ हे प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. शिवाय त्यांची प्रकृतीही खालावली होती. कांजूरमार्ग येथील ३२ वर्षांच्या रुग्णाचा भाजी व्यवसाय असून, सतत पाण्यातून चालण्याची व मद्यप्राशनाची सवय असल्याने त्याला लेप्टोची लागण झाली. त्याचे अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. माटुंगा येथील ३० वर्षांचा पुरुष इलेक्ट्रिशियन असून त्याला पाण्यातून चालण्याची आणि मद्यप्राशनाची सवय होती. त्याला लेप्टोची लागण होऊन उलट्या, स्नायू दुखीचा त्रास सुरु झाला आणि अवयव निकामी होऊन मृत्यू झाला.