मुंबई / प्रतिनिधी
महापालिकेत होणाऱ्या सभांमधून घेण्यात आलेले निर्णय पालिकेच्या संकेतस्थळावरवर प्रदर्शित करावेत व या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागवण्यात यावेत अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. तसा प्रस्ताव सोमवारी महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावावर सर्व गटनेत्यांनी चर्चा केली. घेतलेल्या निर्णयावर नागरिकांचे मत मागवणे हे लोकशाहीच्या चौकटीत बसणारे नाही. यामुळे या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिके निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपा यांनी एकमेकांवर केलेल्या गलिच्छ आरोपांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. निवडणुकी दरम्यानच्या गलिच्छ राजकारणामुळे महापालिकेच्या नावाची बदनामी झाली आहे. यामुळे महापालिका सभा, विशेष व वैधानिक समित्यांच्या सभेची कार्यक्रम पत्रिका, त्यावर घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर नियमित प्रदर्शित करण्यात यावेत. तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयावर नागरिकांच्या सूचना व आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलबध करून द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. स्थायी समितीत घेण्यात येणाऱ्या निर्णयावर जास्त प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात येत असल्याने स्थायी समितीत घेतलेल्या निर्णयाबाबत हि सुविधा सर्वप्रथम सुरु करावी. नंतर इतर समित्यांनाही हि सुविधा काही कालावधीने सुरु करावी, नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागवण्याची सुविधा तातडीने लागू करण्याची मागणी रईस शेख यांनी केली आहे.
या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली असता महापालिका बैठकांचे प्रस्ताव वृत्तपत्रातून प्रसिद्ध करते. प्रस्तावावर चर्चेआधी लोकांना सूचना करता व आक्षेप घेता येऊ शकतात. मात्र एकदा का प्रस्ताव मंजूर झाले त्यांनतर मात्र त्या निर्णयावर सूचना व आक्षेप मागवल्यास हे लोकशाहीला साजेसे ठरणार नाही. निर्णय झाल्यानंतर सूचना व आक्षेप मागवणे लोकशाहीच्या चौकटीत बसणारे नाही. यामुळे असा प्रस्ताव मंजूर करणे योग्य ठरणार नाही. यामुळे या प्रस्तावावर आज फक्त चर्चा झाली. प्रस्ताव सादर करणारे रईस शेख हे आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याने पुढच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
