डॉ संजय देशमुखांनी मुंबई विद्यापीठाच्या 111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटविल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2017

डॉ संजय देशमुखांनी मुंबई विद्यापीठाच्या 111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटविल्या


मुंबई - अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा आर्थिक मनोरा डावाडोल असून गेल्या 22 महिन्यात आर्थिक चणचण भासताच 111 कोटींच्या ठेवी मुदत संपण्यापूर्वीच वटविल्याची धक्कादायक कबुली मुंबई विद्यापीठाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीवरुन उघडकीस आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठण भोपळा असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आकडे फुगविल्याचे स्पष्ट होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे विविध बँकेतील ठेवी तसेच मुदतपूर्वीच तोडलेल्या ठेवीची माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने अनिल गलगली यांस 1 जुलै 2015 पासून 31 मे 2017 पर्यंतची माहिती दिली. विविध बँकेतील 100 ठेवी मुदतपूर्वीच वटवित मुंबई विद्यापीठाने आलेला पैसा वापरला आहे. 20 नोव्हेंबर 2015 पासून 28 एप्रिल 2017 या कालावधीत 110 कोटी 87 लाख 90 हजार 661 इतकी प्रचंड रक्कम मुदतपूर्वीच वटविल्याने मुंबई विद्यापीठास 3 कोटी 55 लाख 6 हजार 656 आणि 49 पैसे इतके व्याज मिळाले जे मुदत संपल्यावर 4 पट झाले असते.

1 कोटींहून अधिक रक्कम 11 वेळा काढण्यात आली. त्यात 1 सष्टेबर 2016 रोजी सर्वात मोठी रक्कम म्हणजे 6 कोटी 64 लाख 75 हजारांची रक्कम बँक ऑफ बडोदा येथून वटविण्यात आली ज्यावर 14 लाख 73 हजार 211 इतक्या रक्कमेचे व्याज मिळाले. 100 ठेवी ज्या बँकेतून मुदत पूर्वीच वटविण्यात आल्या आहेत त्या सर्व ठेवी 1 वर्षासाठीच्या मुदतीसाठी होत्या. 29 सष्टेबर 2016 रोजी 17 ठेवी वटविण्यात आल्यात. 14 सष्टेबर 2016 रोजी 26 ठेवी , 7 सष्टेबर 2016 रोजी 21 ठेवी, 30 सष्टेबर 2016 रोजी 6 ठेवी अश्या सष्टेबर महिन्यात 71 ठेवी वटविण्याचे काम फत्ते झाले आहे.

10 मार्च 2017 पर्यंत मुंबई विद्यापीठाकडे सामान्य निधीची रक्कम फक्त 15 कोटी होती ती सुद्धा आजमितीपर्यंत शून्यावर जाऊन पोहचली आहे. मुंबई विद्यापीठाच्या खात्यावर विविध निधीच्या माध्यमातून 518 कोटीच्या ठेवी विविध बँकेत जरी असल्या तरी त्यापैकी अधिकांश निधीचा वापर करण्याची इच्छा असूनही कोणीच त्या निधीचा वापर करु शकत नसल्यामुळे 110 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटविण्याचे काम कुलगुरु डॉ संजय देशमुख यांनी केले आहे. दि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीस अकाउंट्स कोड 1.72 नुसार ठेवी आणि गुंतवणूकबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरु यांस आहे.

अनिल गलगली यांनी याबाबत संताप व्यक्त करत कुलपती असलेले राज्यपाल यांस पत्र पाठवून ताबडतोब कुलगुरु डॉ संजय देशमुख यांस बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आधीच निकाल वेळेत घोषित न करणारे डॉ देशमुख आता ठेवी रक्कमेवर बोळा फिरवित आहे. अर्थसंकल्पाचे आकडे फुगवित नियोजनाच्या अभावी मुंबई विद्यापीठाची अवस्था दारुण झाली आहे .लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या विद्यापीठाकडे आहे त्याची आर्थिक बाजू खिळखिळी करणाऱ्या सर्व जबाबदार अधिका-यांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी सरतेशेवटी अनिल गलगली यांनी केली आहे.

Post Bottom Ad