१ ऑगस्‍टपासून राणीबाग प्रवेश शुल्क व पेंग्विन दर्शन महागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१ ऑगस्‍टपासून राणीबाग प्रवेश शुल्क व पेंग्विन दर्शन महागणार

Share This

स्थानिक रहिवाश्याना राणीबागेत प्रवेश बंदी - संध्याकाळचा फेरफटका बंद -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टा खातर भायखळा येथील राणीबागेत पेंग्विन कक्ष सुरु करण्यात आला आहे. राणी बागेतील प्रवेश आणि पेंग्विन दर्शनासाठी जास्तीचे शुल्क आकारले जावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या दरवाढीला मुंबईच्या पहारेकरी असलेल्या भाजपाने विरोध केला होता मात्र सभागृहात गाफील असलेल्या पहारेकऱ्यामुळे हा प्रस्ताव मजूर झाला असल्याने मुंबईकरांना १ ऑगस्‍टपासून जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्‍या दिनांक ०६ जुलै, २०१७ रोजीच्‍या सभेमध्‍ये मंजूर झालेल्‍या ठरावानुसार वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे तसेच पेंग्विन दर्शनाच्या प्रवेशशुल्‍क व इतर शुल्‍कामध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. हे सुधारित दर १ ऑगस्‍ट २०१७ पासून लागू होणार आहेत. यामध्‍ये १२ वर्षांवरील प्रौढ व्‍यक्‍तींकरीता प्रत्येकी रु.५०/-, ३ ते १२ वर्षांपर्यंत मुलांकरीता प्रत्येकी रु.२५/-, १२ वर्षांवरील २ प्रौढ व्‍यक्‍ती व ३ ते १२ वर्षांपर्यंत २ मुलांकरीता (कुटुंबासह) रु.१००/- प्रवेशशुल्क घेतले जाणार आहे.

खासगी शाळांतील ३ ते १२ वर्षे वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणाऱया शालेय विद्यार्थ्‍यांसाठी प्रत्येकी रु.१५/-, गटासोबत येणाऱया प्रौढ व्‍यक्‍तींकरीता प्रत्येकी रु.५०/-, खासगी शाळांतील १२ वर्षांवरील वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणाऱया विद्यार्थ्‍यांकरीता प्रत्येकी रु.२५/-, परदेशी अभ्‍यागत १२ वर्षांवरील प्रौढ व्‍यक्‍तींकरीता प्रत्येकी रु.४००/- आणि परदेशी अभ्‍यागत ३ ते १२ वर्षांपर्यंत मुलांकरीता प्रत्येकी रु.२००/- असे शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थी, ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ व दिव्‍यांग व्‍यक्‍तींना विनामुल्‍य प्रवेश असणार आहे.

दुचाकी वाहनाकरीता प्रत्‍येकी रु.५/-, चारचाकी वाहनाकरीता प्रत्‍येकी रु.२०/- आणि बससाठी प्रत्‍येकी रु.४०/- असा वाहनतळ शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. साध्‍या कॅमेऱयासाठी प्रत्‍येकी रु.१००/- आणि चलत् कॅमेऱयासाठी प्रत्‍येकी रु.३००/- शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्‍ये सकाळी ६.०० ते ८.०० मध्‍ये फेरफटका मारु इच्छिणाऱया १८ वर्षांवरील नागरिकांसाठी दरडोई रु.१५०/-प्रतिमहिना इतके शुल्‍क आकारण्‍यात येईल. तर ६० वर्षे व त्‍यावरील ज्‍येष्‍ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्‍यात येईल. बुधवारी, साप्‍ताहिक सुट्टीचा दिवस असल्‍याने सकाळचा फेरफटका मारण्‍यासाठी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्‍ये प्रवेश देण्‍यात येणार नाही. तसेच संध्‍याकाळचा फेरफटका संपूर्णपणे बंद करण्‍यात आला आहे.

स्थानिक रहिवाश्याना राणीबागेत प्रवेश बंदी --
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्‍या आसपासच्‍या शाळांतील विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पालकांद्वारे शाळांतून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्‍या परिसरामधून नेण्‍या-आणण्‍याची याआधी सुरु असलेली प्रथा उपरोक्‍त ठरावान्‍वये पूर्णपणे बंद करण्‍यात आली आहे असे पालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून स्थानिक नागरिकांना राणीबागेतून ये जा करण्यावर बंदी आणली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages