शाडूमातीपासून बनविलेल्‍या गणेशमूर्तीची प्रतिष्‍ठापना करावी – महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शाडूमातीपासून बनविलेल्‍या गणेशमूर्तीची प्रतिष्‍ठापना करावी – महापौर

Share This

सजावटीकरीता कागदाचा जास्तीत - जास्त वापर करावा
मुंबई / प्रतिनिधी - प्‍लॉस्टिक ऑफ पॅरिसचे विघटन होत नसल्‍याने पर्यावरणपुरक अशा शाडूमातीपासून बनविलेल्‍या गणेशमूर्तीची गणेश मंडळानी प्रतिष्‍ठापना करावी, तसेच श्री गणेशाच्या सजावटीकरीता मखर बनवताना कागदाचा जास्तीत-जास्त वापर करण्यावर भर द्यावा असे आवाहन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांच्या बैठकीत महापौर बोलत होते. यावेळी महापौरांच्या हस्ते श्री गणेशोत्सव– २०१७ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी श्री गणेशोत्सव आगमनानिमित्त करण्यात येणारी तयारी ही भव्यदिव्य आणि समाधानी असते. देशभरासह जगातील लोक उत्साहाने यात सहभागी होतात. बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरिकांसाठी तसेच त्यांच्या परिवारांसाठी हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, याचे नियोजन करण्याचे तसेच रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्या छाटणी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शांतता क्षेत्राबाबत मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली असून मुख्‍यमंत्री याबाबत लवकरच धोरणात्‍मक निर्णय घेतील तोपर्यंत वाट पाहण्‍याचे आवाहन महापौरांनी केले.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले की, गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाईल. समुद्र किनारी आणि चौपाटय़ांवर सुरक्षेच्या दृष्टीने जनप्रबोधन करण्यात येईल. गणेशाच्या आगमनापूर्वी बृहन्मुंबई क्षेत्रातील रस्त्यांवरील वृक्षांची छाटणी करण्यात येईल. गणेशोत्सव अधिक आनंददायी व मोठय़ा उत्साहात साजरा करताना गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी नमूद केले. राजकीय पक्षांच्‍या पदाधिकाऱयांनी गणेश मंडपात बॅनर लावताना हुद्दा व पदनाम लिहू नये, नियमानुसार मंडळांनी कार्यवाही करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही अतिरिक्‍त आयुक्तांनी यावेळी केले. प्रशासनाकडून आरोग्याच्यादृष्टीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही आपापल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहनही अतिरिक्‍त आयुक्त सिंघल यांनी यावेळी केले.

बैठकीला उप महापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावंकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत (बाळा) नर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर, ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल.जऱहाड, श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे) चे अध्यक्ष तथा माजी मंत्री लिलाधर डाके, सचिव तथा माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, उप आयुक्त (परिमंडळ – २) व गणेशोत्सवाचे समन्वयक आनंद वागराळकर, सर्व परिमंडळीय उप आयुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त व पालिका अधिकारी हे याप्रसंगी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages