मुंबई - जीएसटीमुळे मुंबई महापालिकेच्या जकातीची नुकसान भरपाई महापालिकेला देण्यासाठी सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपाने जोरदार शक्ति प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांचे आगमन होताच भाजप नगरसेवकांनी ‘मोदी..., मोदी..’चे जोरदार नारे देण्यास सुरवात केली. त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेनेच्या नगरसेवकांनी प्रत्त्युत्तर देताना ‘चोर है... चोर है’ च्या घोषणा दिल्या. सभागृहात सुरु असलेल्या नारेबाजीमुळे सभागृहात ‘मोदी... मोदी... चोर है.. चोर है’ अश्या घोषणा ऐकू येत होत्या. यामुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी चांगलेच तापले होते. या कार्यक्रमा दरम्यान भाजपाच्या एका नगरसेवकालाही शिवसैनिकांनी चोपल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. जीएसटी निमित्त शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकत्र येत असताना घोषणाबाजी आणि मारहाणीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी आधीपासून शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्षांनी आपली युती तोडली आहे. निवडणुकीदरम्यान या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. यानंतर निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष म्हणून समोर आला तर भाजपाने आपण पहारेकऱ्यांची भूमिका पार पाडणार असल्याचे जाहीर केले. या काळात भाजपाने शिवसेनेला सातत्याने कचाट्यात पकडण्याचे काम केले आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीनंतर पालिकेच्या कामकाजात प्रत्येक वेळी शिवसेनेला - भाजपा आमने सामने आले होते. आज पुन्हा मुंबई महानगरपालिका सभागृहात जीएसटीच्या माध्यमातून द्यावयाचा पहिलाच धनादेश देण्याचा कार्यक्रम सुरु असताना भाजपचे नगरसेवक सभागृहात 'मोदी - मोदी" नावाच्या घोषणा देत होते. त्यात भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकर हे घोषणा देण्यात आघाडीवर होते. भाजपच्या इतर नगरसेवकांनाही ते भडकवत होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सभागृहात भाषणाला सुरुवात करणार असतानाच नार्वेकर यांनी भाजपाच्या नगरसेवकांना सभागृहा बाहेर नेण्यास सुरुवात केली. यावेळी आपल्या पक्ष प्रमुखांचा अनादर केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकानी नार्वेकर यांना सभागृहाबाहेर आणि पालिका मुख्यालयाखाली चांगलाच चोप दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान नार्वेकर यांनी काही पत्रकारांकडे आपल्याला मारहाण झाल्याचे, आपले शर्ट फाडल्याचे, पायाला लागल्याचे कबुल केले आहे तर काही पत्रकारांना आपल्याला फक्त धक्काबुक्की झाल्याचे म्हटले आहे.