मुंबई - मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ५० हजार पोलिसांची ताफा तैनात करण्यात आला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची अपेक्षित संख्या लक्षात घेता, बंदोबस्तासाठी शहराबाहेरूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणांची चाचपणी करून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भायखळाच्या जिजामाता उद्यान येथून सुरू होणारा मोर्चाचा आझाद मैदान येथे समारोप होणार आहे. त्यासाठी राणीचा बाग, खडा पारसी जंक्शन, होन्डा कॉर्नर जंक्शन, मगदुमशहा उड्डाणपूल (जे.जे. पूल), एमआरए मार्ग पोलिस ठाणे व आझाद मैदान इत्यादी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणांची इत्थंभूत माहिती मुख्य नियंत्रण कक्ष, दक्षिण प्रादेशिक व मध्य प्रादेशिक नियंत्रण कक्षावरून संपर्क साधून दिली जाणार आहे.
दक्षिण व मध्य प्रादेशिक विभागातील पोलिसांसह इतर विभागांतूनही अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. त्यात सशस्त्र पोलिस दल, पूर्व प्रादेशिक विभाग, पश्चिम प्रादेशिक विभाग, उत्तर प्रादेशिक विभाग, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्य नियंत्रण कक्ष येथील सहायक पोलिस आयुक्त, ३३ पोलिस निरीक्षक, ४३ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ६०० पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. याशिवाय ३१ महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच १५० महिला पोलिसांचा समावेश आहे. बंदोबस्ताला तैनात पोलिसांव्यतिरिक्त आप्तकालीन स्थितीत प्रत्येकी ३०० पोलिस मुंबई पोलिस आयुक्तालय, आझाद मैदान व मध्य प्रादेशिक परिमंडळ कार्यालय येथे राखीव ठेवण्यात येणार आहेत.
विशेष अतिरिक्त कुमक - ६ एसीपी, ७५ पोलिस अधिकारी व ६०० पोलिस तसेच ३१ महिला अधिकारी व १५ महिला पोलिस, १६५ सशस्त्र पोलिसांचा समावेश आहे.
मध्य विभाग -आरसीपी १ प्लाटून(सशस्त्र पोलिस), ०१ गॅस स्कॉर्ड, ०१ वरूण (पाण्याचा टँकर), १५ मोठी वाहने, २५ वॉकी टॉकी, १ सीसीटीव्ही, राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, ०१ बीडीडीएस स्कॉर्ड
दक्षिण विभाग -१७ मोठी वाहने, राज्य राखीव पोलिस दलाच्या ६ तुकड्या, पश्चिम विभागासाठी राखीव एक कंपनी व एक प्लाटून, उत्तर विभागाकडून दोन प्लॅटून, ५ गॅस स्क्वार्ड, डीएफएमडी ३०, एचएचएमडी ३०, २ व्हिडीओग्राफर, ४० वॉकी-टॉकी, शीघ्रकृती दल ६ तुकड्या, सीसीटीव्ही १, १० मार्क्समॅन वाहने व ५ कॉम्बॅट वाहने.