मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईच्या रस्त्यांवरील 95 टक्के खड्डे बुजल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यासाठी कोल्डमिक्स तसेच खडी डांबराचा वापर आतापर्यंत करण्यात आले असून पडलेले खड्डे तात्काळ बुजण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिका-याने दिली. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे मिडास टच आणि इस्त्रायल या देशातील स्मार्टफिल तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. पावसाच्या उघडीपीमुळे आतापर्यंत मुख्य रस्ते आणि जंक्शन खड्डे मुक्त केल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मोठ्या पावसातही रस्ते उखडले जाणार नाहीत, अशा प्रकारचे कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान यंदाच्या पावसाळ्यात वापरले जाते आहे.ऑस्ट्रेलिया देशातून मिडास टच नावाचे तंत्रज्ञान तसेच इस्त्रायल देशातून स्मार्टफिल नावाचे कोल्डमिक्स तंत्रज्ञान आयात केले आहे. या कोल्डमिक्सचा दर प्रतिकिलो130 रुपये असून आतापर्यंत 20 टन कोल्डमिक्सचा खड्डे भरण्यासाठी वापर केला आहे. तसेच पालिकेने खडी डांबरने खड्डे बुजविण्यासाठी 50 टन खडी डांबराचा वापर केला आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्या प्रायोगिक तत्वावर या दोन्ही देशातील तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ते अधिक चांगले असल्याने त्याचा वापर पालिकेने करण्याचे ठरविले होते. 70 लाख रुपयेकिंमतीचे 38 टन कोल्डमिक्स पालिकेने खरेदी केले आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा खड्डेमुक्त राहिल असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे.