मुंबई / प्रतिनिधी -
वर्धापन दिन आणि रक्षाबंधन या सणाच्या दिवशीच बेस्टचा संप झाल्याने मुंबईत एकही बेस्टची बस रस्त्यावर धावलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने सोमवारी सायंकाळी संप मागे घेण्यात आला. सोमवारी संप मागे घेण्यात आला असला तरी मंगळवारी सकाळपासून बस रस्त्यावर धावणार आहेत. यामुळे मुंबईकर नागरिकांचे व प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. अश्यातच सत्ताधारी शिवसेनेकडून बेस्टचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे, हे पटणारे नसल्याने बेस्ट दिनाच्या कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार घातला असल्याची माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले.
बेस्टच्या संपाबाबत बोलताना रवी राजा यांनी बेस्टची आर्थिक स्थिती ही मागील 15 वर्षांपासून बिघडत चालली आहे. मागील 22 ते 25 वर्षांपासून बेस्ट समिती शिवसेना आणि भाजपाच्या ताब्यात आहे. गेल्या 22 वर्षांत शिवसेना भाजपाचे नगरसेवकच बेस्ट समिती अध्यक्ष झाले आहेत. बेस्ट प्रशासनावर बेस्ट समितीचे नियंत्रण असल्याने बेस्टच्या आर्थिक डबघाईला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, २२ वर्षात सेना- भाजपाने बेस्टची वाट लावली असून त्यांच्यामुळेच संपाची वेळ कामगारांवर आली असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. बेस्टला आर्थिक मदत करणे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य असल्याने बेस्टला पालिकेनेच आर्थिक मदत करायला हवी. पालिकेकडे पैसे नसल्यास राज्य सरकारकडे निधीची मागणी पालिका करू शकते. बेस्ट हा पालिकेचा अंगीकृत उपक्रम असल्याने मदतीसाठी महापालिकेनेच आधी पुढे यायला हवे असे रवी राजा यांनी म्हटले आहे.