पालिका रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2017

पालिका रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी


मुंबई / प्रतिनिधी - पालिका रुग्णालयात गरजेची औषधे जाणीवपूर्वक विलंबाने दिली जातात. याचा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच पैसे देऊन बाहेरून औषधे घ्यावी लागतात. या प्रकरणाचे स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. रुग्णालयात उशिरा औषधे पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या चौकशीचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे आदेश समिती अध्यक्षांनी पालिका प्रशासनाला दिले. 
मुंबईत साथींचे आजार बळावत आहेत. डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. पालिकेकडे वैद्यकिय उपयायोजना करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा नाही. रुग्णालय प्रशासनाकडून रक्त, लघवी आदी चाचण्या खासगी लॅबकडून करण्याचे सल्ले दिले जातात. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक रुग्णांना बाहेरील लॅबमध्ये जावून चाचण्या करणे शक्य होत नाही. कोट्यवधी रुपये रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी मुंबई महापालिका मुंबईकरांना खर्च करते. तरीही वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांची परवड होत असल्याने स्थायी समितीत याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. सर्व पक्षीय नगरसेवकांनी यावेळी प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णांना वेळेत सेवा- सुविधा मिळाव्यात, यासाठी कोणतेही अाडकाठी न ठेवता स्थायी समिती आरोग्य विभागाचे सगळेच प्रस्ताव मंजूर करते. परंतु, रुग्णांच्याबाबतीत प्रशासन गंभीर असल्याचे दिसत नाही. दहा- दहा महिने रुग्णांना जाणीवपूर्वक वैद्यकिय सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला. औषधे खरेदीच्या प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या मंजूरीसाठी आला होता. याप्रस्तावावर हरकत घेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच खडसावले. उपचार करता येत नसतील, तर रुग्णालये बंद करावीत, अशा शब्दात संताप व्यक्त केला. बाहेरुन औषधे आणयला सांगणाऱ्या वैद्यकीय विभागाने रुग्णांना भरपाई द्यावी, आैषधे खरेदीला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी, या चौकशीचा अहवाल स्थायी समिताला सादर करावा, अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली. तसेच रुग्णांबाबत बेफिकीर राहणाऱ्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी औषधे खरेदीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा, अशी उपसूचना सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मांडली.

दरम्यान, निवडणुकीमुळे औषधांचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याची कबूली पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. अखेर उपसूचनेसह प्रस्ताव दप्तरी दाखल करत, रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याची काळजी घ्यावी असे निर्देश देत वैद्यकिय विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी दिले.

Post Bottom Ad