मुख्य लेखापरिक्षक बनसोडे यांची पुन्हा महापालिकेत नेमणूक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्य लेखापरिक्षक बनसोडे यांची पुन्हा महापालिकेत नेमणूक

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक सुरेश बनसोडे यांच्यावर भाजपाने केलेल्या गंभीर आरोपानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यायालयाने बनसोडे यांना महापालिकेत पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता बनसोडे यांची पुन्हा महापालिकेत नेमणूक करण्यात आली आहे. बनसोडे यांची पुन्हा त्याच पदावर नेमणूक करावी लागल्याने हा पालिका आयुक्त व भाजपाला जबरदस्त धक्का असल्याची चर्चा सध्या पालिका मुख्यालयात आहे.
महापालिकेतील मुख्य लेखापरीक्षक या पदावर कार्यरत असलेले सुरेश बनसोडेंच्या सांगण्यावरून वरळी हब येथील कार्यालयात कुलाबा सांडपाणी प्रकल्पाच्या कंत्राटाची कागदपत्रे कंत्राटदारांच्या दोन प्रतिनिधींना दाखवण्यात आली. या दोघांनी या कागदपत्रांचे मोबाईलमध्ये फोटो काढले. पालिकेत पुढे येणाऱ्या टेंडरसाठी याचा वापर केला जाणार असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला होता. कोटक यांनी आयुक्तांकडे याबाबत तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बनसोडें यांना ताबडतोब राज्य सरकारकडे परत पाठवले होते.

याविरोधात बनसोडे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी बनसोडे यांच्या वकिलांनी बदलीचा अधिकार आयुक्तांना नाही, तर फक्त राज्य शासनालाच आहे, असा दावा केला. त्यानुसार न्यायालयाने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. जुलै महिन्यात न्यायालयाने स्थगिती देऊनही बनसोडेंना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. त्यामुळे बनसोडेंनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. यामुळे शुक्रवारी त्यांना प्रशासनाच्या वतीने ऑर्डर देण्यात आली आणि त्याचदिवशी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages