मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेने एका दिवसांत ३० हजार ७८९ चौरस फूटांचे अनधिकृत बांधकाम तोडले. कारवाई दरम्यान एकूण ७० व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामेही तोडली आहेत. महापालिकेच्या २४ पैकी २१ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान तोडण्यात आलेल्या ७० अनधिकृत बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ हे सुमारे ३० हजार ७८९ चौरस फूट एवढे होते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.
बुधवारी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान सुमारे ३० हजार ७८९ चौ.फू. एवढ्या एकूण क्षेत्रफळाची ७० बांधकामे तोडण्यात आली आहेत. यामध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पोटमाळा, खोली, शेड, गॅलरीचा भाग बंद करुन तयार करण्यात आलेली खोली, गच्चीवर अनधिकृतपणणे शेड टाकून तयार करण्यात आलेला मजला, अनधिकृतपणे वाढवून केलेले ओट्याचे बांधकाम इत्यादींचा समावेश होता. या कारवाई दरम्यान 'ए' विभागातील मादाम कामा रोड वरील 'हॉटेल बॉम्बे विंटेज' चे सुमारे १०० चौ.फूटांचे अनधिकृत बांधकाम; तर 'जी दक्षिण' विभागातील कमला मिल परिसरात असणा-या हॉटेल 'वन अवोब' व हॉटेल 'मोजो' येथील सुमारे २ हजार चौ. फूटाचे अनधिकृत शेड हटविण्यात आले आहे. ताडदेव परिसरातील 'वैद्य मॅन्शन' या इमारतीत अनधिकृतपणे बांधलेल्या सुमारे ४५० चौ.फू. खोलीचे बांधकाम, यासह शहर भागात एकूण १४ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक आयुक्त मधुकर मगर यांनी दिली आहे. तर वांद्रे पश्चिम परिसरतील 'सिगडी' हॉटेल येथील सुमारे ५६५ चौ.फू.चे अनधिकृत बांधकाम, 'माश्शाद' हॉटेल व 'हारुन सलून' चे प्रत्येकी सुमारे ६०० चौ. फू.चे अनधिकृत बांधकाम देखील निष्कासित करण्यात आले आहे. 'पी दक्षिण' विभागात 'न्यु भारत इंडस्ट्रियल इस्टेट' येथील गच्चीवर सुमारे १२०० चौ. फू. जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले शेड; तर 'एम पूर्व' विभागात गोवंडी परिसरातील 'युनिक हॉल' येथील सुमारे १० हजार ५०० चौ. फू. चे अनधिकृत बांधकाम यासह पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये एकूण ५६ अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या कारवाईसाठी २१ विभागांमध्ये महापालिकेचे सुमारे १७५ कामगार, कर्मचारी - अधिकारी कार्यरत होते.