प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी परिवहन विभागाचे ॲप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी परिवहन विभागाचे ॲप

Share This

मुंबई, दि. १८ - प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मागण्यासाठी तसेच वाहतुकीसंदर्भातील तक्रार करणे नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी परिवहन विभागातर्फे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवासी आता एका क्लिकवर आपल्या समस्या परिवहन विभागाकडे नोंदवू शकणार आहे. RTO Maharashtra या नावाने हे ॲप उपलब्ध आहे. तक्रारी नोंदविण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी केले आहे.

सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करताना नागरिकांना अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळेस तक्रार करण्यासाठी योग्य व्यासपीठ त्यांना तत्काळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने परिवहन विभागातर्फे RTO Maharashtra हे ॲप तयार केले आहे. हे ॲप डाऊनलोड करून नागरिक सहजरित्या त्यांच्या समस्या व तक्रारी नोंदवू शकणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रिक्षा, टॅक्सी, व इतर कुठल्याही वाहनांविरूद्ध सहजरित्या तक्रार करता येणार आहे. अशी माहिती डॉ. गेडाम यांनी दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून RTO Maharashtra या नावाने ॲप डाऊनलोड करून घ्यावे, हे येथे मोफत उपलब्ध होईल, www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेब आधारीत प्रणालीद्वारे तक्रार करण्यासाठी तक्रार (complaint) या शीर्षकाखाली लिंक देण्यात आली असून जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्याची सुविधा - सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करताना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मागण्याची सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे. अडचणींमध्ये असल्यासंदर्भात नातेवाईकांना ठिकाणासंदर्भातील संदेश SOS या बटनाद्वारे तत्काळ देणे शक्य होणार आहे. आपात्कालीन परिस्थितीमध्ये या मोबाईल ॲपद्वारे नजीकच्या पोलीस नियंत्रण कक्षास दूरध्वनी करण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध आहे. अपघाताप्रसंगी तातडीची मदत मागविण्यासाठी या ॲपचा उपयोग होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages