
मुंबई, दि. 2 : दुर्गम भाग आणि मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवरमध्ये आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी बाईक ॲम्ब्युलन्स वरदान ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत राज्यातील नागरिकांना विविध विभागांच्या विमा योजनांचे संरक्षण मिळण्याकरिता राज्य शासनाची विमा कंपनी सुरु करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मरीन ड्राईव्ह येथील जी.एम.सी. जिमखाना सभागृहाच्या प्रांगणात ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
महत्वाकांक्षी अशा योजनेची संकल्पपूर्ती केल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात 108 क्रमांकाच्या आपत्कालीन वैद्यकीय रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 16 लाख रुग्णांना जीवनदान देण्यात आले आहे. तर याच रुग्णवाहिकेमध्ये राज्यभरात 15 हजार प्रसृती यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. याच धर्तीवर मुंबईसारख्या वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्स रुग्णांना वेळेवर उपचार करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. जव्हार, मोखाडा, पालघर, नंदुरबार, मेळघाट या भागातील दुर्गम पाड्यांमध्ये विशेषत: पावसाळ्यात ज्यावेळी संपर्क तुटतो तेथे ही बाईक ॲम्बुलन्स वरदान ठरणार आहे. त्यामुळे मुंबईसह दुर्गम भागात ही सेवा उपयुक्त ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील दुर्गम भागात देखील दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी याकरिता आरोग्य विभागातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यात पूर्णपणे लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून ही योजना देशातील क्रांतीकारक योजना ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण देशात बाईक ॲम्ब्युलन्सची सेवा देणारे मुंबई पहिले शहर ठरले-उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, मुंबईसारख्या शहरामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. या बाईक ॲम्ब्युलन्समुळे वाहतुकीचा अडथळा दूर करत गरजू रुग्णाला त्वरीत उपचार मिळणार आहे. संपूर्ण देशात अशी सेवा देणारे मुंबई हे पहिले शहर ठरले आहे,याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा त्यांनी गौरव करीत बाईक ॲम्बुलन्स संकल्पना वास्तवात आणल्याबद्दल ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांचे कौतुक केले.
बाईक ॲम्ब्युलन्सविषयी : -
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या प्रकल्पासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष ऊरो रुग्णालय, औध, पुणे येथे उभारण्यात आलेला आहे. हाच नियंत्रण कक्ष सदरील प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. मोटार बाईक ॲम्ब्युलन्स वाहन चालविण्यासाठी संबंधित पॅरामेडीकलना आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रशिक्षणासाठीचे मॉडेल तज्ञांच्या मान्यतेने तयार करण्यात आले आहे. इमर्जन्सी कीट, एअर वे कीट, ट्रॉमा कीट, अग्नीशामक यंत्र ही उपकरणे व विविध औषधे या मोटारबाईक रुग्णवाहिकेत असणार आहेत.
· अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार
· १०८ क्रमांकाहून आपत्कालीन परिस्थितीत २४ तास मोफत वैद्यकीय सेवा
· सर्व संबंधित विभागाशी तातडीने समन्वय
· सर्व मोटार बाईक अॅम्ब्युलन्स अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज
· मोबाईल ॲपवर कॉलिंगची सुविधा
