पर्यटनासाठी मुंबई जगाचे आकर्षण ठरेल- मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पर्यटनासाठी मुंबई जगाचे आकर्षण ठरेल- मुख्यमंत्री

Share This

मुंबई, दि. १५ - मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे. पर्यटनासाठी मुंबई जगाचे आकर्षण ठरेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि पर्यटन विभागाच्यावतीने गेटवे ऑफ इंडिया याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेक्स्ट जनरेशन मॅपिंग प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, भारतरत्न सचिन तेंडूलकर, आमदार राज पुरोहित, उद्योगपती आनंद महेंद्र, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, प्रकल्पाचे प्रमुख सौरभ गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रोजेक्शन मॅपिंग प्रणालीद्वारे इतिहास आकर्षकपणे दाखविण्यात आला आहे. आपला इतिहास समृद्ध आहे. हा कमी वेळात प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे सादर केला आहे. हा कार्यक्रम १५ दिवस मुंबईकरांसाठी दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाबाबत लोकांचे मत/प्रतिक्रिया आपले सरकार वेब पोर्टलवर घेऊन त्यानुसार आवश्यक बदल करण्यात येतील. गेट ऑफ इंडिया या ठिकाणाची एक वेगळी ओळख असल्याने याठिकाणी सादर झालेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

या प्रणालीसाठी हिंदी भाषेसाठी आवाज दिलेल्या सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन व मराठीसाठी आवाज दिलेले प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांचेही मुख्यमंत्री यांनी विशेष आभार मानले. मुंबईत येत्या २१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक स्तरावरील व्यापार मेळावा व व्हीजिट महाराष्ट्र- व्हीजिट मुंबई यासाठीच्या बोधचिन्हाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

प्रास्ताविक माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम यांनी केले. त्यांनी प्रोजेक्शन मॅपिंग प्रणालीची माहिती दिली. हा कार्यक्रम पुढील १५ दिवस सायंकाळी ८ ते ९ या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया येथे सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages