महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ क्रूझ पर्यटनाला देणार चालना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ क्रूझ पर्यटनाला देणार चालना

Share This
मुंबई - ‘द डॉन ऑफ क्रूझ टुरिझम इन इंडिया’च्या औचित्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करत पर्यटनाला चालना देण्याच्या उद्दिष्टाने क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इतर मान्यवर उपस्थित होते. 

क्रूझ पर्यटन हे क्षेत्र जगभरातील अत्यंत व्हायब्रंट आणि वेगाने वाढत जाणारे क्षेत्र आहे. आतापर्यंत क्रूझ पर्यटन वाढतच गेले आहे आणि आर्थिक वाढीसाठी हा एक महत्त्वाचा घटक झाला आहे. आज, या क्षेत्रात पूर्वीपेक्षा वैविध्यपूर्ण प्रकारच्या सुविधा देण्यात येतात आणि सेवा पुरविण्याच्या बाबतीतही हे क्षेत्र आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले, "भारतातील क्रूझ पर्यटनासाठी गृहबंदर (होमपोर्ट) म्हणून आमची निवड झाल्याचा आम्हाला आनंद आहे. क्रूझ केंद्र म्हणून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी धोरणे आखण्यासाठी नौवहन मंत्रालयाशी सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि परदेशी पर्यटकांसाठी क्रुझ पर्यटनामध्ये प्रचंड संधी निर्माण होणार आहे. क्रूझ पर्यटन हे 'गेम चेंजर' असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळणार आहे आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतातील वाढणारी मागणी लक्षात घेत इटली येथील कोस्टा क्रूझने मुंबई ते मालदिव्ह्ज व्हाया कोचिन या मार्गावर कोस्टा निओक्लासिका ही क्रुझ सेवा सुरू केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रवासाला सुरुवात होईल आणि कोस्टा क्रूझ निओक्लासिकामध्ये १७०० प्रवासी आणि ६५८ केबिन असतील. या निमित्ताने नव्या संधी प्राप्त होतील आणि त्यामुळे क्रूझ बंदर उभारण्यास चालना मिळेल. या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर्ससाठी आणि भारतात क्रूझ पर्यटन विकसित करण्यासाठी संधी प्राप्त होतील, असे त्यांनी सांगितले.

भारताला लाभलेल्या समृद्ध नैसर्गिक स्रोतांमुळे भारतात क्रूझ पर्यटन विकसित होण्यासाठी प्रचंड संधी आहे. त्याचप्रमाणे क्रूझ पर्यटन विकसित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये एमटीडीसी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि वाढत्या पर्यटकांना निश्चितच एक उत्तम अनुभव देईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages