माहीम रेल्वे अपघाताची चौकशी करण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2017

माहीम रेल्वे अपघाताची चौकशी करण्यात येणार


मुंबई । प्रतिनिधी -
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हार्बर मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून लोकलचे डबे घसरून अपघात झाला होता. या अपघातामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. यादुर्घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वेच्या हार्बर मार्गावर माहीम स्थानकाजवळ शुक्रवारी अंधेरीला जाणाऱ्या एका लोकलचे चार डबे रुळावरून घसरून सहा प्रवासी जखमी झाले होते. अंधेरीला जाणारी लोकल माहीम स्थानकातच थांबवून ती पुन्हा सीएसएमटीसाठी चालवण्यात येणार होती. हार्बरवरील वांद्रे स्थानकाजवळच असलेल्या रोड ओवर ब्रिजवरून एका खाजगी क्लासचा बॅनर ओवरहेड वायरवर पडला होता. त्यामुळे ओवरहेड वायरला विद्युतपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी, अंधेरीला जाणारी लोकल माहीम स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळी ९.५० च्या सुमारास माहीम स्थानकाजवळच येताच ५ क्रमांकाच्या फलाटावरून ६ क्रमांकाच्या फलाटावर जाण्यासाठी लोहमार्ग ओलांडत होती. त्याच वेळी या लोकलचे चार डबे लोहमार्गावरून घसरल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अपघातामुळे घाबरलेल्या काही प्रवाशांनी लोकलमधून उडय़ा मारल्या. त्यात पाच महिला आणि एक पुरुष प्रवासी जखमी झाले. अपघातामुळे ७० लोकल फेऱ्या रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर ओढवली. २० लोकल विलंबाने धावत होत्या. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १० तास लागले. रात्री पावणेआठच्या सुमारास माहीम स्थानकाजवळील हार्बर मार्ग लोकल चालवण्यासाठी सुरक्षित असल्याची तपासणी पूर्ण होताच हार्बर सेवा पूर्ववत करण्यात आली. या अपघातात भाग्यीलक कनोजीया गंभीर जखमी झाल्याने रेल्वेकडून त्यांना २५ हजार रुपये तर अन्य पाच प्रवाशांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS