कच-यामध्ये डेब्रिजची भेसळ करणा-या ७ कंत्राटदारांविरोधात महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2017

कच-यामध्ये डेब्रिजची भेसळ करणा-या ७ कंत्राटदारांविरोधात महापालिकेची कारवाई


मुंबई | प्रतिनिधी
ओल्या व सुक्या कच-याची वाहतूक करताना राडारोड्याची भेसळ केली जात असल्य़ाचे उघड झाले आहे. पालिकेने अचानक केलेल्या तपासणी दरम्यान कच-याचे वजन वाढविण्यासाठी कच-यामध्ये डेब्रिजची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरव्यवहाराबाबत संबंधित ७ कंत्राटदारांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली.

ओल्या व सुक्या कच-याच्या वाहतूक विषयक कंत्राटातील अटी व शर्तींनुसार कच-यामध्ये राडा-रोडा किंवा गाळ असायला नको. मात्र याबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या अचानक तपासणी दरम्यान २४ घटनांमध्ये कच-यात राडारोड्याची भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार व्हिडीओग्राफीसह करण्यात आलेल्या अचानक तपासणी दरम्यान कच-याचे वजन वाढविण्यासाठी कच-यामध्ये डेब्रिजची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका क्षेत्रातील कच-याचे योग्य नियोजन व्हावे व कच-याच्या प्रमाणात घट व्हावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल २०१६ मध्ये दररोज सरासरी सुमारे ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढे असणारे कच-याचे प्रमाण हे सध्या ७ हजार ७०० मेट्रीक टनापर्यंत कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे. हे प्रमाण अजून कमी व्हावे यासाठी कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यात येत असून आतापर्यंत ३८ कचरा वर्गीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच याबाबत विविध स्तरीय उपाययोजनाही अंमलात आणण्यात येत आहेत. याच उपाययोजनांतर्गत कचरा संकलनाबाबत अचानक तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी दिले होते. या आदेशांनुसार विभाग स्तरीय कचरा संकलन केंद्र, कचरा वर्गीकरण केंद्र, रिफ्यूज ट्रान्सपोर्ट स्टेशन यासह क्षेपणभूमीवर वाहनातून कचरा टाकण्याबाबत अचानक तपासणीसह व्हिडीओग्राफी करण्यात येत आहे. याच तपासणी दरम्यान २४ घटनांमध्ये कच-यात डेब्रिजची भेसळ करुन वजन वाढवून गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले.

डिसेंबर २०१६ पासून क्षेपणभूमीवर कचरा वाहून आणणा-या गाड्या व कच-याचे वजन याबाबत पारदर्शकता जपण्यासाठी अत्याधुनिक संनियंत्रण यंत्रणा देवनार क्षेपणभूमी येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेल्या या यंत्रणेनुसार क्षेपणभूमीवर येणा-या व क्षेपणभूमीवरुन बाहेर जाणा-या प्रत्येक वाहनाचे वजन, वाहनाच्या पुढील व मागील ‘नंबरप्लेट’चे छायाचित्र, वाहन येण्याची व जाण्याची वेळ संगणकीय पद्धतीने नोंदविली जाते. या संगणकीय नोंदीची तपासणी करुनच कचरा वाहतुक कंत्राटदाराला देयकांची रक्कम दिली जात आहे, असे बालमवार यांनी सांगितले.

व्हिडीओग्राफीसह केली तपासणी --
के पूर्व विभागात ७, एल विभागात ५, एच पूर्व विभागात ४, जी उत्तर व पी उत्तर विभाग प्रत्येकी २ घटनांमध्ये कच-यात भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे. तर इ, आर मध्य, आर उत्तर विभागात प्रत्येकी एका ठिकाणी कच-यात भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच कुर्ला पश्चिम परिसरात असणा-या 'कुर्ला रिफ्यूज ट्रान्सपोर्ट स्टेशन' येथे भेसळीची एक घटना निदर्शनास आली आहे. या सर्व २४ घटनांशी संबंधित असणा-या ७ कंत्राटदारांविरोधात कुर्ला व विक्रोळी पोलीस स्टेशन येथे पालिकेने लेखी तक्रार दाखल केली आहे.

कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटिस --
कच-यामध्ये राडारोड्याची भेसळ करणा-या कंत्राटदारांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कच-यामध्ये राडारोड्याची भेसळ करुन कच-याचे वजन वाढविण्यासाठी गैरव्यवहार करणा-या कंत्राटदारांविरोधात महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. यामुळे दैनंदिन कचरा संकलनाच्या वजनात काही प्रमाणात घट होऊन कचरा वहन खर्चात बचत होईल, अशी अपेक्षा पालिकेला आहे. तसेच व्हिडीओग्राफीसह अचानक तपासणी यापुढेही चालू राहील असे बालमवार यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS