मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील हुसैनी इमारत दुर्घटना घटून ३३ जणांचा मृत्यू झाला होता. हुसैनी प्रमाणेच इतरही इमारती धोकादायक असल्याने आणखी काही दुर्घटना घडून आणखी लोकांचे जीव जाऊ शकतात. आणखी लोकांची जीवित हानी घडण्याची शक्यता असल्याने आजुबाजुंच्या इमारती येत्या काही दिवसांत पाडल्या जाणार आहेत. सैफी बु-हाणी ट्रस्ट तर्फे येथील इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. दरम्यान सध्या मुलांच्या शाळा, कॉलेज असल्याने तूर्तास येथील रहिवाशांनी इमारत खाली करण्यासाठी नकार दिला आहे. मात्र या इमारती धोकादायक असल्याने या इमारती तातडीने रिकामी करणे आवश्यक असल्याने स्थलांतरास नकार देणा-या रहिवाशांना पोलिस बळाचा वापर करून इमारती रिकाम्य़ा करण्याचा निर्णय़ प्रशासनाने घेतला आहे.भेंडी बाजारातील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऎरणीवर आला आहे. येथील इमारती 100 वर्षाहून अधिक काळापासून दाटीवाटीने वसल्या आहेत. अत्यंत जिर्ण अवस्थेत असलेल्या या इमारती पाडण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. कोसळलेल्या हुसैनी इमारतीच्या अगदी जवळपास असणा-य़ा चार ते पाच इमारती येत्या काही दिवसांत पाडल्या जाणार आहेत. या इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याबाबतच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र येथील रहिवाशांनी सध्या तरी स्थलांतरास नकार दिला आहे. येथील रहिवाशांना चुनाभट्टी येथील संक्रमण शिबिरांत स्थलांतर केले जाईल असे सांगितले जाते आहे. मात्र आता स्थलांतर झाल्यास मुलांच्या शाळा, कॉलेजचे काय? त्यांचे नुकसान होईल त्यामुळे येथील रहिवाशांनी स्थलांतरास तूर्तास तरी नकार दिला असल्याची येथील एका रहिवाशांने सांगितले.
दक्षिण मुंबईत सुमारे १४ हजार मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. यापैकी सुमारे अडीच हजार इमारतींचा लवकर पुनर्विकास करणे आवश्यक आहे. जुन्या इमारती असल्याने या इमारतीतील रहिवाशांचे त्वरीत स्थलांतरीत करण्यासाठी म्हाडाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हुसैनी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील सुमारे सव्वादोन हजार इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करावे लागणार आहे. इमारत खाली करण्यास नकार देणा-या रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.