मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत, संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ ते शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या संगीत समारोहाचे २९ वे वर्ष आहे.
‘जागतिक संगीत दिन’ निमित्ताने आयोजित या संगीत समारोहाचा शुभारंभ मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले (पूर्व) येथे दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, सुप्रसिद्ध गायिका व संगीततज्ज्ञ तसेच संगीत कला अकादमी सल्लागार समिती सदस्या श्रुती सडोलीकर-काटकर तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व पद्मजा वाडकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर या स्वीकारणार आहेत.
शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले (पूर्व) येथे दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात या संगीत समारोहाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर या स्वीकारणार आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, ज्येष्ठ रंगकर्मी व सुप्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर, माजी संगीत विभाग प्राचार्य व ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पंडित मुरली मनोहर शुक्ल तसेच सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव हे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘हम पंछी एक डाल के’ हा महापालिका शालेय विद्यार्थ्यांचा शतरंगी कार्यक्रम सादर होणार आहे. बुधवार, दिनांक ४ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ हे विद्याधर गोखले लिखित संगीत नाटक संगीत व कला अकादमी सादर करणार आहे. गुरुवार, दिनांक ५ ऑक्टोबर, २०१७ रोजी ‘ओडिसी नृत्याविष्कार’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी संगीत समारोहाच्या समारोपप्रसंगी ‘मन वढाय वढाय’ विविध गीतांमधून घेतलेला मनावा ठाव असा हा कार्यक्रम रंगणार आहे. संगीत विभागाच्या प्राचार्या सुवर्णा कागल – घैसास यांनी या सर्व कार्यक्रमांना दिग्दर्शन केले आहे. या संगीत समारोहास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.